चोऱ्या करा; महिन्याला २५ हजार रुपये पगार घ्या; नोकरीच्या शोधातील तरुणांना विचित्र ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 23:32 IST2026-04-12T23:32:04+5:302026-04-12T23:32:15+5:30
बिहारी टोळीच्या सूत्रधाराची भन्नाट आयडिया

चोऱ्या करा; महिन्याला २५ हजार रुपये पगार घ्या; नोकरीच्या शोधातील तरुणांना विचित्र ऑफर
नागपूर: बेरोजगारी, त्यामुळे होणारी आर्थिक कोंडी आणि त्यातून आलेले नैराश्य तरुणाईला सैरभैर करणारे ठरते. नैराश्यामुळे चांगले काय, वाईट काय, यातील फरक दुर्लक्षित करून अनेक जण पैसे मिळवण्यासाठी गुन्हेगारीच्या वळणावर जातात. तर, अशा तरुणांवर नजर ठेवून असणारे समाजकंटक त्यांना पैशासह वेगवेगळे आमिष दाखवून त्यांच्याकडून चोऱ्या-माऱ्या करवून घेतात. आरपीएफच्या टास्क टीमने एका चोरीच्या गुन्ह्यातून अशाच एका टोळीच्या म्होरक्याचा छडा लावण्यात यश मिळवले आहे. त्याने चोऱ्या करण्यासाठी बेरोजगार तरुणांना आपल्या टोळीत चक्क पगारावर नियुक्त केल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.
विविध मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये धाडसी चोऱ्या करणाऱ्या एका टोळीतील चाैघांना रेल्वे सुरक्षा दलाने रेल्वे पोलिसांच्या मदतीने पकडले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी दिलेली माहिती ऐकून तपास अधिकारीही चक्रावले आहेत. या टोळीचे नाव आहे, 'खगडिया पेपर' टोळी. टोळीचा सूत्रधार बिहारमधील खगडिया जिल्ह्यातील रहिवासी असल्याने या टोळीला खगडिया, तर टोळीतील सदस्य पेपर वाचण्याचा बनाव करून पेपरच्या आडून चोरी करतात म्हणून 'खगडिया पेपर'असे नाव पडले आहे. या टोळीने नागपुरात तगडा हात मारल्यानंतर आरपीएफचे सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी आपल्या पथकांकडून कसून चाैकशी केली आणि या टोळीतील कैलाश गणेश दास (वय ४२, रा. भुजवा गोगरी, जि. खगड़िया, बिहार), मिथिलेश रवि प्रसाद शाह (वय २९, रा. करोति बाजार, उदय किशनगंज, जि. मधेपुरा, बिहार) आणि किशन सुभाष निषाद (वय २२, रा. बजरंग पारा सरस्वती नगर दुर्ग, छत्तीसगढ) या तिघांच्या मुसक्या बांधल्या. चाैकशीत उघड झालेल्या माहितीनुसार,या टोळीच्या सूत्रधाराची आयडिया भन्नाट तेवढीच धक्कादायक आहे. सूत्रधार स्वत: आणि आपल्या साथीदारांच्या माध्यमातून टोळीत तरुणांची भरती करण्यासाठी १२ महिने प्रयत्नरत असतो. बेरोजगार आणि निराश तरुणांना ही टोळी हेरते. सलगी वाढविल्यानंतर तो त्यांना चक्क १५ ते २५ हजार रुपये महिन्याची नोकरी देण्याची ऑफर देतो. काम काय करायचे, असा प्रश्न कुणी केला तर त्याला तो फार कष्ट नाहीत, असे म्हणून सरळ चोरी करायचे सांगतो.
प्रारंभी छोटे टार्गेट, त्यासाठीही ट्रेनिंग !
टोळीत नव्याने सामील झालेल्यांना सुरुवातीला चोरीचे छोटे टार्गेट दिले जाते. त्याचे ट्रेनिंगही दिले जाते. नंतर त्यांना मोठ्या चोरीसाठी तयार केले जाते. प्रत्येक चोरीनंतर ‘पगार’ वाढवला जातो आणि अशा प्रकारे तरुण नकळत गुन्हेगारीच्या खोल गर्तेत जाऊन सराईत चोरटा बनतो. अशा प्रकारे या भामट्याने आपल्या टोळीत विविध प्रांतातील डजनभर तरुणांना सहभागी करून घेतले आहे.
कार्यपद्धतीही तितकीच शिताफीची
कमी कष्टात भरपूर पैसा देण्याची आफॅर देऊन बेरोजगार तरुणांना गुन्हेगारीच्या दलदलीत ओढणाऱ्या या टोळीचा खगडिया सूत्रधार त्यांच्या राहण्याचीही विशेष व्यवस्था करतो. तो स्वत: सध्या छत्तीसगडमधील भिलाई (सुपेला) परिसरात राहोत. ज्या भागाातील सदस्य टोळीत सहभागी केले त्या भागातील चोरट्यांची त्यांच्या गाव-शहराच्या आजुबाजुला अर्थात इतवारी नागपूर, भिलाई, रायगड, बिलासपूर यांसारख्या गजबजलेल्या रेल्वे स्थानकांच्या आसपास भाड्याने राहण्याची व्यवस्था केली जाते. गर्दी, गोंधळ आणि प्रवाशांची बेपर्वाई याचा फायदा घेत ही टोळी क्षणार्धात मौल्यवान वस्तूंवर हात साफ करते आणि आपल्या निवासस्थानी निघून जाते.