लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्राचे वनक्षेत्र २१ टक्के आहे. यातील ६५ टक्के वन विदर्भात असून, महाराष्ट्राचे वनक्षेत्र ३० टक्के करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली.
वनमंत्री पदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर वनमंत्री गणेश नाईक यांनी पहिल्यांदाच प्रधान मुख्य वनसंरक्षक कार्यालयाला (वनबल प्रमुख) भेट दिली. यावेळी प्रसारमाध्यमांसोबत ते बोलत होते. वनमंत्री म्हणाले, वन विभागातील महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करण्यासाठी दोन दिवसीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यात अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना देण्यात येतील. यात प्रामुख्याने मानव - वन्यजीव संघर्ष तसेच वाघांच्या मृत्यूबाबत विचारमंथन होणार आहे. सोबतच वन विभागाचे उत्पन्न वाढविण्यासाठी वन विकास महामंडळ आणि सामाजिक वनीकरणच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
सेमिनरी हिल्स येथील हरिसिंग सभागृहात आयोजित बैठकीत वनमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचा क्लास घेत वनविभागाच्या एकात्मिक सबलीकरणाबाबत चर्चा केली. बैठकीत वनविभागाचे संरचनात्मक विस्तारीकरण, आर्थिक व कार्यात्मक सबलीकरणाबाबत विविध शाखांचे वरिष्ठ वनाधिकारी गुरुवारी सादरीकरण करणार आहेत. बैठकीला अपर मुख्य सचिव (वने) मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) शोमिता बिश्वास, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) श्रीनिवास राव, वन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव गौड, प्रधान मुख्य वनसंरक्षक (उत्पादन) विवेक खांडेकर, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (प्रशासन व दुय्यम संवर्ग) ऋषिकेश रंजन, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (कॅम्पा) प्रवीण चव्हाण, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (केंद्रस्थ अधिकारी) नरेश झुरमुरे, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.