राज्य शासनाकडून एसटी महामंडळाला १२० कोटींचा निधी
By नरेश डोंगरे | Updated: April 11, 2025 20:17 IST2025-04-11T20:17:23+5:302025-04-11T20:17:23+5:30
४४ टक्केचा विषय मार्गस्थ : एसटीच्या कर्मचाऱ्यांना दिलासा

राज्य शासनाकडून एसटी महामंडळाला १२० कोटींचा निधी
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : आर्थिक तंगीमुळे पगाराचे वांदे आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये रोष वाढल्याने अडचणीत आलेल्या एसटी महामंडळाला राज्य शासनाने १२० कोटींचा निधी दिला आहे. यातून एसटी महामंडळाने आपला खर्च भागविण्याची सूचनाही शासनाने केली आहे.
उल्लेखनीय म्हणजे, एसटीकडे आता प्रवाशांच्या रांगा लागल्या आहेत. मोठ्या प्रमाणात प्रवासी वाढल्याने एसटीच्या तिजोरीत चांगली भर पडत आहे. असे असून देखिल एसटीचे ईतर खर्च भागविताना महामंडळाची दमछाक होत आहे. परिणामी कर्मचाऱ्यांच्या पगाराचे वेळोवेळी वांद्ये होत आहेत.
मार्च २०२५ चा पगार देतानाही असेच झाले. एसटी महामंडळाकडे निधीच नसल्याने अखेर कर्मचाऱ्यांच्या एकूण पगाराच्या रकमेपैकी केवळ ५६ टक्केच पगाराचे एसटीने वाटप केले. अंगावर असलेले कर्ज, मुलांच्या शिक्षणाचा खर्च आणि काैटुंबिक गरजा भागविताना रडकुंडीला आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांमध्ये यामुळे प्रचंड रोष निर्माण झाला. त्यामुळे कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात आले. राज्यभरातील कर्मचाऱ्यांमध्ये त्या संबंधाने कुरबूर सुरू असल्याचे लक्षात आल्याने महामंडळाकडून राज्य सरकारकडे विनंती करण्यात आली. या पार्श्वभूमीवर, आज महाराष्ट्र शासनाने एसटीच्या पदरात १२० कोटींचा निधी घातला. यासंबंधीच्या निर्णयाचे परिपत्रक आज एसटीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर व्हायरल झाले. परिणामी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला.
उर्वरित पगाराची व्यवस्था
शासनाकडून ऐनवेळी मिळालेल्या या आर्थिक मदतीचा उपयोग सर्वप्रथम कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्याच्या उर्वरित पगाराच्या रकमेचे वितरण करण्यासाठी होणार आहे. त्यासाठी विभाग निहाय स्तरावर अधिकाऱ्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत.
सुट्यांमुळे वाढली प्रतिक्षा
सरकारने निधीची घोषणा केली असली तरी कर्मचाऱ्यांच्या हातात त्यांच्या पगाराची शिल्लक रक्कम मंगळवार किंवा त्यानंतरच पडू शकेल. कारण शनिवारपासून तो सोमवार पर्यंत सुट्यांमुळे सरकारी कोषागार बंद राहिल. परिणामी एसटीच्या कर्मचाऱ्यांना शिल्लक असलेला पगार घेण्यासाठी आणखी तीन दिवस प्रतिक्षा करावी लागू शकते.