पोलिसांची १५ हजार ६३१ रिक्त पदे भरण्याला राज्यसरकारकडून मंजुरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 15:02 IST2025-08-22T14:59:19+5:302025-08-22T15:02:50+5:30
गृह विभागाने दिली मंजुरी : राज्य सरकारचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

State government approves filling of 15,631 vacant police posts
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलिस शिपाई व कारागृह शिपाई संवर्गातील १५ हजार ६३१ रिक्त पदे भरण्याला गृह विभागाने मंजुरी प्रदान केली आहे. गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) अनुपकुमार सिंग यांनी गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून ही माहिती दिली.
यासंदर्भात न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. न्यायालयाने पोलिस विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी वेळोवेळी आवश्यक निर्देश दिले होते. सध्या नागपूर शहर पोलिस आयुक्तालयामध्ये विविध संवर्गातील ४४७ व जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयांतर्गत ३९१ पदे रिक्त आहेत.
याशिवाय, पोलिस आयुक्तांनी सहायक उपनिरीक्षकाच्या ६, पोलिस हेड कॉन्स्टेबलच्या ४२, पोलिस कॉन्स्टेबलच्या २०७ व पोलिस अंमलदाराच्या १३६ तर, जिल्हा पोलिस अधिक्षकांनी पोलिस निरीक्षकाच्या १६, सहायक पोलिस निरीक्षकाच्या ३७, पोलिस उप-निरीक्षकाच्या १५८, सहायक पोलिस उप-निरीक्षकाच्या २४६, पोलिस हवालदाराच्या ६९१ व पोलिस शिपायाच्या एक हजार ३९ नवीन पदांची मागणी केली आहे. अॅड. राहील मिर्झा यांनी न्यायालय मित्र म्हणून कामकाज पाहिले.
भरली जाणारी रिक्त पदे
- सशस्त्र पोलिस शिपाई - २ हजार ३९३
- पोलिस शिपाई - १२ हजार ३९९
- कारागृह शिपाई - ५८०
- पोलिस शिपाई चालक - २३४
- बॅण्डस्मन - २५