नासुप्र विश्वस्तांसाठी राजकीय फिल्डिंग
By Admin | Updated: July 18, 2014 01:11 IST2014-07-18T01:11:45+5:302014-07-18T01:11:45+5:30
नागपूर सुधार प्रन्यासमध्ये अनंतराव घारड व किशोर कन्हेरे यांचा विश्वस्तपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर वर्णी लावण्यासाठी इच्छुकांनी जोरात राजकीय फिल्डिंग लावली आहे.

नासुप्र विश्वस्तांसाठी राजकीय फिल्डिंग
काँग्रेसकडून धवड, पन्नासे, तिडके, वंजारी : राष्ट्रवादीतून पाटील- आर्य स्पर्धेत
नागपूर : नागपूर सुधार प्रन्यासमध्ये अनंतराव घारड व किशोर कन्हेरे यांचा विश्वस्तपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर वर्णी लावण्यासाठी इच्छुकांनी जोरात राजकीय फिल्डिंग लावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यासाठी जोरात सक्रिय झाले आहे. काँग्रेस नेत्यांच्या फारशा हालचाली सुरू असल्याचे दिसत नसले तरी प्रयत्न शर्तीचे सुरू आहेत.
नासुप्रमध्ये आमदारांचा प्रतिनिधी, नगरसेवकांचा प्रतिनिधी, स्थायी समिती अध्यक्ष यांना विश्वस्त बनविले जाते. दोन सदस्यांची नियुक्ती राज्य सरकार करते. या दोनपैकी एक-एक पद काँग्रेस- राष्ट्रवादीने वाटून घेतले आहे. यापूर्वी काँग्रेसकडून अनंतराव घारड तर राष्ट्रवादीकडून किशोर कन्हेरे हे विश्वस्त होते. त्यांचा कार्यकाळ १८ जून रोजी संपला. यानंतर कन्हेरे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश घेतला. घारड पुन्हा इच्छुक नाहीत. त्यामुळे या दोन्ही जागांसाठी इच्छुक समोर आले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसच्या कोट्यातून माजी आमदार अशोक धवड यांचे नाव आघाडीवर आहे. धवड शहर अध्यक्षपदासाठी इच्छुक होते. पण संधी हुकली. माजी खासदार विलास मुत्तेमवार यांच्या गटाकडून बाबुराव तिडके व मुकुंदराव पन्नासे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.
निष्ठावान व जुन्या काँग्रेसीला संधी द्यावी, असा मुद्दा समोर करण्यात येत आहे. दक्षिणच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेले अॅड. अभिजित वंजारी हे देखील शर्यतीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अजय पाटील व माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य यांच्यात जोरात रस्सीखेच सुरू आहे.
सुरुवातीला प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांचेही नाव होते. पण ते मागे पडले. विधानसभेत काँग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेले नेते हा विषय सध्या प्रलंबित राहिला तर बरे होईल, या मताचे आहेत. विश्वस्तपद मिळाले तर तिकीट मिळणार नाही, या धास्तीने अनेकांनी इच्छा असूनही दावा केलेला नाही. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या कोट्यात शहरातील एकही जागा नसल्यामुळे तेथे विश्वस्त पदासाठी उघड स्पर्धा पहायला मिळत आहे. (प्रतिनिधी)