जुनी इमारत पाडली, प्रत्यक्ष कामाला सुरुवात १३ माळ्यांची भव्य इमारत उभी राहणार, १३०० मुलांची राहणार क्षमता
आनंद डेकाटे, नागपूर :
नागपुरातील सर्वात जुन्या शासकीय वसतिगृहांपैकी एक असलेल्या संत चोखामेळा वसतिगृहाच्या अत्याधुनिक इमारतीच्या कामाला सुरुवात झाली आहे. जुनी इमारत पाडण्यात आली असून, नवीन बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे. दीक्षाभूमी परिसरात उभारण्यात येत असलेली ही इमारत तब्बल १३ माळ्यांची राहणार असून, ७८ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. तब्बल १३३६ विद्यार्थी येथे राहून शिकू शकतील, हे विशेष.
सामाजिक न्याय विभागांतर्गत असलेले दीक्षाभूमी परिसरातील चोखामेळा शासकीय वसतिगृह हे अतिशय जुने वसतिगृह आहे. या वसतिगृहाला ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. येथे राहून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी पुढे अधिकारी झाले. मोठमोठ्या पदांवर गेले. आजही येथे शिकलेले अनेक जण सनदी अधिकारी आणि विविध क्षेत्रात मोठमोठ्या पदांवर कार्यरत आहेत. अतिशय जुनी इमारत असल्याने ती हळूहळू जीर्ण होत होती. त्यामुळे या इमारतीला पाडून नवीन इमारत तयार करण्याचे प्रयत्न अनेक दिवसांपासून सुरू होते. अखेर याला यश आले. दोन वर्षांपूर्वी फेब्रुवारी महिन्यात त्यासंदर्भात शासन निर्देशही जारी करण्यात आले आहेत. या इमारतीला पाडून त्याच ठिकाणी दोन अत्याधुनिक इमारती उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तेव्हा यावर एकूण ५८ कोटी रुपये खर्च होणार असून, त्याची तरतूदही करण्यात आलेली आहे. पुढे हा खर्च वाढला. तो ७८ कोटीवर गेला. त्याला प्रशासकीय मान्यताही मिळाली. कोरोनामुळे काम बंद पडले. बांधकामाचा खर्च पुन्हा वाढला. सध्या यावर १०० कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. चोखामेळाच्या वसतिगृहाच्या जागेवरच नवीन इमारत बांधण्यात येत आहे. प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. जुनी इमारत पाडण्यात आली असून, पायव्याचे काम सुरू झाले आहे. एनएमआरडीतर्फे ही इमारत उभारली जात आहे. तेरा माळ्याच्या या इमारतीमध्ये ३३४ खोल्या राहणार असून, १३३६ विद्यार्थी येथे राहू शकतील इतकी याची क्षमता राहील.
बॉक्स..
बुद्धिस्ट आर्किटेक्चरवर आधारित इमारत
चोखामेळा वसतिगृह हे अगदी दीक्षाभूमीला लागून आहे. वसतिगृहाला लागूनच सामाजिक न्याय भवनाची नवीन इमारत उभारण्यात आली आहे. ती इमारत बुद्धिस्ट आर्किटेक्चरवर आधारित आहे. एकूणच दीक्षाभूमीचा परिसर विचारात घेता चोखामेळा वसतिगृहाच्या नवीन इमारतीचे डिझाईनसुद्धा बुद्धिस्ट आर्किटेक्टप्रमाणे करण्यात आले आहे. त्यामुळे हा सर्व परिसर या इमारतींनी वेगळ्याच पद्धतीने खुलून दिसेल.