पोलीस कुटुंबीयांना लाभणार स्थैर्य
By Admin | Updated: May 31, 2014 00:55 IST2014-05-31T00:55:08+5:302014-05-31T00:55:08+5:30
एकाच ठिकाणी दोन वर्षे सेवा देणारे पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षकांच्या बदलीचे धोरण शासनाने ठरविले होते. त्यात शासनाने सुधारणा केली आहे. यामुळे किमान ६ वर्षे तरी

पोलीस कुटुंबीयांना लाभणार स्थैर्य
दिलासा : दर दोन वर्षांनी बदलीच्या निर्णयाला शासनाची स्थगिती
अमरावती : एकाच ठिकाणी दोन वर्षे सेवा देणारे पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षकांच्या बदलीचे धोरण शासनाने ठरविले होते. त्यात शासनाने सुधारणा केली आहे. यामुळे किमान ६ वर्षे तरी पोलीस कर्मचार्यांना एकाच ठिकाणी राहता येणार आहे. शासनाच्या या धोरणात्मक निर्णयामुळे पोलिसांच्या कुटुंबीयांनाही स्थैर्य लाभणार आहे.
पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्यांबाबत सर्वसाधारण धोरण निश्चित करण्यात आले होते. पोलीस शिपायांच्या नेमणुकीनंतर प्रशिक्षण व मुख्यालयातील ३ वर्षांचा सेवा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याची मुख्यालयातून अन्यत्र बदली करण्यात येत होती.
ज्या पोलीस कर्मचार्यांचा एका पोलीस ठाण्यात दोन वर्षांचा सेवा कालावधी पूर्ण झाला असेल त्यांना त्याच उपविभागाच्या परिमंडळातील दुसर्या पोलीस ठाण्यात बदलीवर पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. उपविभाग किंवा परिमंडळात चार वर्षांचा व सध्या कार्यरत असलेल्या ठिकाणी दोन वर्षे पूर्ण करणार्या कर्मचार्यांना अन्य पोलीस ठाणे, मुख्यालय, घटक, शाखा या ठिकाणी बदलीवर पाठविण्याचा निर्णय ७ एप्रिल २0१४ रोजी शासनाने घेतला.
या निर्णयाविरोधात पोलीस व अधिकार्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच या निर्णयामुळे पोलीस कर्मचार्यांच्या मुलांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येणार होते. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मध्ये सुधारणा अध्यादेश २0१४ नुसार बदली नियमात सुधारणा करण्यात आली आहे.
तसेच या अध्यादेशात काही दुरूस्ती करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. त्यामुळे या सुधारणा होईस्तोवर केवळ पोलीस शिपाई ते सहायक पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या पूर्वीच्याच धोरणानुसार अस्तित्वात असलेल्या नियमांच्या कार्यपद्धतीनुसार करण्यात याव्यात, असे आदेश पोलीस महासंचालक (आस्थापना) यांनी दिले आहेत. या निर्णयामुळे पोलीस कर्मचार्यांच्या कुटुंबांना स्थैर्य लाभणार आहे. (प्रतिनिधी)