संचारबंदीमुळे एसटीच्या पेन्शनर्सचे आंदोलन रद्द, आल्यापावली परतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 16:45 IST2025-03-19T16:44:17+5:302025-03-19T16:45:27+5:30

Nagpur : मोजक्या पदाधिकाऱ्यांनी पीएफ कार्यालयात जाऊन वरिष्ठांना दिले निवेदन

ST pensioners' protest cancelled due to curfew, returns back to home | संचारबंदीमुळे एसटीच्या पेन्शनर्सचे आंदोलन रद्द, आल्यापावली परतले

ST pensioners' protest cancelled due to curfew, returns back to home

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेकरिता सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी एसटीच्या पेन्शनर्सनी आज नागपुरात आयोजित केलेले आंदोलन ऐनवेळी रद्द केले. त्यामुळे बाहेरगावाहून आलेल्या कर्मचाऱ्यांना आल्यापावली परत जावे लागले. नंतर मोजक्या पदाधिकाऱ्यांनी येथील पीएफ कार्यालयात जाऊन वरिष्ठांना निवेदन दिले.


ऑल इंडिया को-ऑर्डिनेशन कमिटी ऑफ ईपीएस ९५, पेन्शनर्स असोसिएशनच्या नेतृत्वात एसटी महामंडळाचे निवृत्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेकरिता सरकारचे वेधून घेण्यासाठी १८ मार्चला राज्यभरात आंदोलन करण्याचे ठरवले होते. या आंदोलनाला राज्य परिवहन महामंडळ निवृत्त कर्मचारी संघटनेने पाठिंबा दिला होता. त्यानुसार, विदर्भातील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी 'चलो नागपूर'ची हाक दिली होती. त्यानुसार आज सकाळपासून नागपुरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौकात असलेल्या पीएफ कार्यालयासमोर वेगवेगळ्या गावची मंडळी जमायला सुरुवात झाली.


मात्र सोमवारी १७ मार्चला रात्री नागपुरात घडलेल्या जाळपोळ, दगडफेकीच्या घटनेमुळे येथील सामाजिक वातावरण बिघडवण्याचे प्रयत्न झाले. परिणामी पोलिसांनी नागपुरातील काही भागात संचारबंदी लागू करून पाचपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येण्यावर बंदी घातली. आज सकाळी संचारबंदीचे वृत्त सर्वत्र पोहचल्याने एसटीच्या पेन्शनर्सना आपले आंदोलन रद्द करावे लागले. परिणामी बाहेरगावाहून आलेले अनेक पेन्शनर्स आल्यापावली नागपूर येथून आपापल्या गावी परत गेले. 


ते आले अन् आक्रमक झाले
राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटीच्या पेन्शनर्सना तुटपुंजी पेन्शन (एक हजार, दोन हजार) मिळते. त्यात जगता येत नाही. त्यामुळे हा अन्याय सहन करण्याऐवजी आपला आवाज बुलंद करण्यासाठी संचारबंदी लागू असतानाही आंदोलन करावे, असे मत काहींनी मांडले. त्यासाठी काहींनी आक्रमक भूमिका घेतली. मात्र, अन्य काही जणांनी त्यांची कशीबशी समजूत काढून त्यांना शांत केले. त्यानंतर संघटनेच्या एका शिष्टमंडळाने प्रादेशिक आयुक्त ईपीएफ शेखर कुमार मागण्यांचे निवेदन दिले. आयुक्तांनी हे निवेदन स्वीकारत ते वरिष्ठांकडे पाठविण्याचे आश्वासन दिले.

Web Title: ST pensioners' protest cancelled due to curfew, returns back to home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.