गुमगाव परिसरात ‘लालपरी’ अजूनही रुसलेलीच; विद्यार्थ्यांसह नागरिकांचेही हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2022 13:19 IST2022-05-06T13:15:14+5:302022-05-06T13:19:19+5:30

नियमित बसफेऱ्या सुरू झाल्या नसल्याने गुमगाव परिसरातील प्रवाशांना भरउन्हात वाहनांच्या प्रतीक्षेत ताटकळत उभे राहावे लागत आहे.

st bus still not running on Gumgaon area, students and citizens facing problems | गुमगाव परिसरात ‘लालपरी’ अजूनही रुसलेलीच; विद्यार्थ्यांसह नागरिकांचेही हाल

गुमगाव परिसरात ‘लालपरी’ अजूनही रुसलेलीच; विद्यार्थ्यांसह नागरिकांचेही हाल

ठळक मुद्देबससेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी

गुमगाव (नागपूर) : ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद असणारी राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बससेवा अद्यापही काही ठिकाणी सुरू झालेली नाही. परिणामी, गुमगाव परिसरातील शेकडो विद्यार्थी व ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. एस.टी. पूर्ववत सुरू करण्याची मागणी सर्वच स्तरांतून करण्यात आली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव जवळ जवळ नसल्यासारखाच झाल्याने शासनाने सर्वच शाळा सुरू केल्या. परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्याचा संपावर तोडगा निघाल्याने कर्मचारीही कर्तव्यावर पूर्ववत रुजू झाले आहेत. त्यातच गेल्या साडेतीन वर्षांपासून गुमगाव वेणा नदीवर पूल नसल्याचे कारण पुढे केले जात होते; पण आता पूलही तब्बल साडेतीन वर्षांनंतर वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. तरीही नियमित बसफेऱ्या सुरू झाल्या नसल्याने गुमगाव परिसरातील प्रवाशांना भरउन्हात वाहनांच्या प्रतीक्षेत ताटकळत उभे राहावे लागत आहे.

गुमगाव, कोतेवाडा, वागदरा, किरमिटी, वडगाव, दाताळा, धानोली , शिवमडका, खडका आदी लगतचे ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी हिंगणा, बुटीबोरी, डोंगरगाव, खापरी, वानाडोंगरी, नागपूर येथे शिक्षण घेत आहेत. लॉकडाऊनच्या अगोदर नागपूर-वर्धा रोडवरील डोंगरगावमार्गे गुमगाव-हिंगणा येथे एस.टी.च्या अनेक फेऱ्या नियमित सुरू होत्या. त्या गुमगाव बस स्थानकावरूनच पुढे जात असत. त्यामुळे बाहेरगावी शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना व नागरिकांनाही या फेऱ्या अतिशय सोयीच्या होत्या; परंतु एस.टी.अभावी विद्यार्थ्यांच्या तसेच प्रवाशांच्याही आशेवर पाणी फेरले गेल्याने त्यांच्यामध्ये निराशेचे वातावरण पसरले आहे.

गत आठ-दहा दिवसांपासून उमरेड आगाराच्या उमरेड-मकरधोकडा - बुटीबोरी-डोंगरगाव-गुमगावमार्गे- हिंगणासाठी लांब पल्ल्याच्या एस.टी.च्या दोन फेऱ्या सुरू झाल्या आहेत. मग नजीकच्या नागपूर आगाराच्या बसफेऱ्या का सुरू होत नाहीत? असा सवालही व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भात संबंधित आगार व्यवस्थापकांना निवेदन दिलेले आहे. एस.टी.च्या फेऱ्या लवकरात लवकर सुरू कराव्यात, अशी मागणी सरपंच उषा बावणे, उपसरपंच नितीन बोडणे, वडगावचे सरपंच अक्षय लोडे पाटील, कोतेवाडाचे माजी सरपंच रवींद्र आष्टनकर, उपसरपंच अशोक फुलकर, सामाजिक कार्यकर्ता गणपत सोनकुसळे, माजी सरपंच विजय नंदनवार, वागदराचे अरविंद वाळके, गणेश साठवणे, शंकर भोंडगे, रवी मुटे, सुखदेव बावणे, प्रकाश उरकुडे, पांडुरंग निमजे, रवींद्र सालवटकर, संजय भोंडगे, अनिल सालवटकर आदींनी केली आहे.

Web Title: st bus still not running on Gumgaon area, students and citizens facing problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.