‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 23:13 IST2025-12-14T23:06:05+5:302025-12-14T23:13:45+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘लोकमत महागेम्स’च्या विशेषांकाचे प्रकाशन

‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: ‘शालेय स्तरावर क्रीडासंस्कृती रुजवणे आणि गावखेड्यांतील प्रतिभावान खेळाडूंना मोठे व्यासपीठ देण्याचा ‘लोकमत’चा हा उपक्रम महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे. राज्य शासन म्हणून आम्ही कायमच अशा उपक्रमांसोबत असू. आजची मुले स्मार्टफोनच्या चक्रव्यूहात अडकली आहेत. त्यांना पुन्हा मैदानात आणण्याचे अवघड काम ‘लोकमत महागेम्स’ने यशस्वी करून दाखवले,’ असे भरभरून कौतुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
येत्या ९ जानेवारी रोजी अभय भुतडा फाउंडेशन प्रस्तुत आणि लोकमत कॅम्पस क्लब आयाेजित ‘लोकमत महागेम्स’चा राज्यस्तरीय बक्षीस वितरण सोहळा पुण्यात पार पडणार आहे. त्यापूर्वी ११ डिसेंबर रोजी नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘लोकमत महागेम्स’च्या विशेषांकाचे प्रकाशन पार पडले, त्यावेळी ते बोलत होते. या वेळी लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन व राज्यसभेचे माजी खासदार डॉ. विजय दर्डा, ‘लोकमत’चे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा, टॅब ग्लोबल व्हेंचर तसेच अभय भुतडा फाउंडेशनचे चेअरमन सीए अभय भुतडा उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "लोकमत महागेम्स हा उपक्रम म्हणजे विद्यार्थ्यांचे सर्वांगीण व्यक्तिमत्त्व घडवणारी चळवळ आहे. तळागाळातील प्रतिभेला व्यासपीठ, संघभावना, शिस्त आणि आत्मविश्वास देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ‘लोकमत’ करत आहे. ‘लोकमत’च्या या उपक्रमातून क्रीडा आणि शिक्षण क्षेत्रांत एक सुंदर संगम घडला आहे."
विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात योग्य व्यासपीठ देणे अत्यंत आवश्यक आहे. शालेय जीवनात स्पर्धात्मकता, संघभावना आणि नेतृत्वगुण विकसित होण्यासाठी असे उपक्रम फायदेशीर ठरतात. ‘लोकमत महागेम्स’सारख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्यांचा योग्य उपयोग करता येतो.
-डॉ. विजय दर्डा, लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन, माजी खासदार
विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात संधी उपलब्ध करून देणारे उपक्रम भविष्यातील खेळाडूंना घडवतात. ‘लोकमत महागेम्स’सारख्या उपक्रमांनी सामाजिक बांधिलकी, शालेय क्रीडासंस्कृती आणि आरोग्यविषयक जाणीव निर्माण केली आहे. आम्ही ‘लाेकमत’च्या अशा समाजाभिमुख उपक्रमांना कायम पाठिंबा देत राहू.
-सीए अभय भुतडा, चेअरमन, टॅब ग्लोबल व्हेंचर
लोकमत महागेम्स, कॅम्पस क्लब अशी विश्वासार्ह व्यासपीठे चिमुकल्या वयात संस्कार पेरण्याचे काम करत आहेत. क्रीडासंस्कारातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. त्यांनी संघभावना आत्मसात केल्यानंतर त्यांना शिस्तीची जाणीव होते. ही जाणीव त्यांना कुठल्याही क्षेत्रात यशस्वी करील.
-रुचिरा दर्डा, संचालक, लाेकमत कॅम्पस क्लब, संस्थापक, महा गेम्स
