नागपुरात भरधाव कारने उड्डाणपुलाचे रेलिंग तोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 01:00 IST2018-06-24T00:56:25+5:302018-06-24T01:00:19+5:30
दुचाकीचालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात भरधाव कार उड्डाणपुलावरून खाली पडता-पडता राहिली. शनिवारी रात्री पाचपावलीतील पुलाच्या मजबुत रेलिंगमुळे एक मोठा अपघात टळला. मात्र, या अपघातामुळे उड्डाणपुलावरील वाहतूक विस्कळीत झाली.

नागपुरात भरधाव कारने उड्डाणपुलाचे रेलिंग तोडले
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दुचाकीचालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात भरधाव कार उड्डाणपुलावरून खाली पडता-पडता राहिली. शनिवारी रात्री पाचपावलीतील पुलाच्या मजबुत रेलिंगमुळे एक मोठा अपघात टळला. मात्र, या अपघातामुळे उड्डाणपुलावरील वाहतूक विस्कळीत झाली.
शनिवारी रात्री ९ च्या सुमारास एमएच ३१/ सीएन २८११ चा कारचालक कमाल चौकातून गोळीबार चौकाकडे वेगाने निघाला. उड्डाणपुलावरून अचानक एक दुचाकीचालक समोर आल्याने त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात कारचालकाचे नियंत्रण सुटले अन् कार सरळ रेलींगवर धडकली. वेग जास्त असल्याने रेलिंग तोडत कारचा समोरचा भाग रेलिंगच्या बाहेर तर अर्धा भाग पुलावर राहिला. कार कधीही खाली पडून शकते, अशी स्थिती असतानाच कारचालक कसा बसा सुरक्षीत बाहेर आला. दरम्यान, या अपघातामुळे उड्डाणपुलावर प्रचंड गर्दी जमली. पोलीस अन् अग्निशमन दलाला बोलविण्यात आले. क्रेनच्या मदतीने लगेच कार सुरक्षीत पुलावर ठेवण्यात आली. हा मार्ग वर्दळीचा आहे. रात्रीच्या वेळी पुलावर आणि पुलाखाली जास्तच वाहतूक असते. कार पुलावरून खाली पडली असती तर मोठा धोका झाला असता. सुदैवाने तो टळला. कारमध्ये कोण होते, त्यांची नावे कळू शकली नाही.