नागपूर : भारत आणि न्यूझीलंडमधील पहिला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना २१ जानेवारी रोजी नागपुरात जामठा येथील व्हिसीएच्या स्टेडिअमवर होणार आहे. यामुळे या परिसरात व वर्धा मार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी नागपूर शहर पोलिस वाहतूक शाखेने वाहनांचे मार्ग व पार्किंगच्या जागा निश्चित केल्या आहेत. सामन्यासाठी येणाऱ्या क्रिकेट रसिकांनी या नियोजित मार्गांनी वाहने आणावी व नमूद केलेल्या पार्किंगच्या जागांवरच आपली वाहने पार्क करावी, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त लोहित मतानी यांनी केले आहे. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी क्रिकेट रसिकांनी शक्यतोवर मेट्रोचा वापर करावा, असेही आवाहन त्यांनी केले आहे.
सर्वसामान्यांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये, यासाठी पोलिसांनी विशेष नियोजन केले आहे. या नियोजनात वाहनांनी येण्याचे व बाहेर पडण्याचे मार्गही निश्चित करण्यात आले आहेत. याशिवाय, दुचाकी व चारचाकी वाहने, स्कूल बस, व्हीआयपी, पोलिस व प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यांच्यासाठी पार्किंगच्या वेगवेगळ्या व्यवस्था करण्यात आल्या आहेत. पोलिस उपायुक्त लोहित मतानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपुरातून जामठा येथे सामन्यासाठी येणारी वाहने वर्धा मार्गावरून नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या मार्गाने जाणाऱ्या डाव्या बाजुच्या रस्त्याने न्यायची आहेत. एनसीआयच्या मार्गावर पुढे गेल्यावर तेथून माऊली नगरीजवळ डावे वळण घेऊन चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी निश्चित करण्यात आलेल्या पार्किंगच्या जागांकडेच आपली वाहने न्यायची आहेत, असे पोलिस उपायुक्त मतानी यांनी स्पष्ट केले आहे.
अशी आहे पार्किंग व्यवस्था
दुचाकी व चारचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी वेगवेगळ्या व्यवस्था आहेत. पार्किंग कक्ष ‘ए’ या ठिकाणी फक्त व्हिआयपी, पोलिस आणि प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींसाठीच वाहनांचे पर्किंग उपलब्ध राहणार आहे. त्यानंतर कक्ष-बी येथे चार चाकी, कक्ष-सी (अन्विता फार्म) येथे दुचाकी वाहने, कक्ष डी-१ येथे एका बाजुला चार चाकी तर दुसऱ्या बाजुला दुचाकी पार्किंग, कक्ष डी-२, डी-३, डी-४, डी-५, इ-(अल्ट्राटेक) येथे चार चाकी वाहनांचे पार्किंग उपलब्ध राहील. कक्ष-जी येथे फक्त मेंबर्स पार्किंग राहणार आहे, तर कक्ष-एच येथे केवळ स्कूल बसचे पार्किंग राहील. कक्ष-आय हा राखीव पार्किंगसाठी ठेवण्यात आला आहे. जामठा टी पाईंटवरून स्टेडियम व जामठा गावाकडे कोणत्याही वाहनांना हा मार्ग वापरता येणार नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
वर्धा मार्गे येणाऱ्या वाहतुकीसाठी निवडा हे मार्ग
वर्धा, बुटीबोरी मार्गाने जामठ्याकडे येणाऱ्या वाहनांसाठी कक्ष-एफ (ब्रह्मकुमारी) निश्चित करण्यात आला आहे. येथे एका बाजुला दुचाकी तर दुसऱ्या बाजुला चार चाकी वाहनांचे पार्किंग उपलब्ध आहे. तेथून स्टेडिअमसाठी फिडर बसची व्यवस्था उपलब्ध राहणार आहे. जामठा टी पॉईंटवरून कोणताही प्रवेश होणार नाही. या मार्गाने फक्त खेळाडू व अंम्पायर यांची वाहने नेण्याची मुभा राहणार आहे. त्याचप्रमाणे स्कूल बस वाहनांना एनसीआयच्या समोरून एक युटर्न घ्यावा लागणार असून पुढे गेट नंबर १३ समोर उपलब्ध पार्किगच्या कक्षात वाहने पार्क करावी लागणार आहेत. व्हिसीएच्या सदस्यांची वाहने देखील याच पद्धतीने प्रवेश घेतील.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मेट्रोचाच वापर करण्याचे आवाहन
जी वाहने जामठा टी पॉईंट क्रॉस करणार आहेत, त्यांच्यासाठी अल्ट्राटेकपुढील पार्किंग येथे चार चाकी पार्किंग उपलब्ध राहणार आहे. त्यांच्यासाठी फिडर बसची सोय आहे. दुचाकी व चारचाकी वाहनांच्या येण्याचे (एंट्री रूट) व बाहेर पडण्याचे (एक्झीट रूट) निश्चित करण्यात आले असून वाहनचालकांनी कोंडी टाळण्यासाठी त्यांचे पालन करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व आपला वेळ वाचविण्यासाठी क्रिकेट रसिकांनी शक्यतोवर मेट्रोचा वापर करावा, असे आवाहनही वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे. वाहनचालकांनी याबाबत अधिक स्पष्टीकरणासाठी वाहतूक पोलिसांकडून जारी करण्यात आलेल्या दिशादर्शक नकाशाचा वापर करावा, असेही सूचित करण्यात आले आहे.
सामन्यापूर्वी व नंतर इतरांनी हा मार्ग टाळावा
जामठा येथे क्रिकेट सामन्यासाठी येणार नसलेल्या पण या मार्गाचे जाण्यास इच्छूक वाहनचालकांनी २१ जानेवारी रोजी सामन्यापूर्वी सायंकाळी ५ ते ७ दरम्यान तसेच रात्री सामना संपल्यावर रात्री १० ते ११.३० दरम्यान हा मार्ग शक्यतोवर टाळावा, असे आवाहन वाहतूक पोलिस उपायुक्त मतानी यांनी केले आहे.
Web Summary : Nagpur police have planned traffic diversions and parking for the India-New Zealand match on January 21st. Spectators are advised to use designated routes, park in specified areas, and consider using the metro to avoid congestion. Other commuters should avoid the route during peak match times.
Web Summary : 21 जनवरी को भारत-न्यूजीलैंड मैच के लिए नागपुर पुलिस ने यातायात परिवर्तन और पार्किंग की योजना बनाई है। दर्शकों को सलाह दी जाती है कि वे निर्धारित मार्गों का उपयोग करें, निर्दिष्ट क्षेत्रों में पार्क करें और भीड़ से बचने के लिए मेट्रो का उपयोग करने पर विचार करें। मैच के दौरान अन्य यात्री इस मार्ग से बचें।