The Speaker of the Legislative Assembly asked for report of NIT | विधानसभा अध्यक्षांनी मागितला नासुप्रचा लेखाजोखा 

विधानसभा अध्यक्षांनी मागितला नासुप्रचा लेखाजोखा 

ठळक मुद्देमुंबईत घेतला कामकाजाचा आढावा 

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागच्या भाजप सरकारने नासुप्र बरखास्त करण्यास मंजुरी प्रदान केली होती. परंतु राज्यातील सत्ता परिवर्तनासोबतच नागपूर सुधार प्रन्यास (नासुप्र)ला पुनरुज्जीवित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी हळूहळू आवश्यक पावले उचलली जात आहे. दरम्यान नासुप्रची सध्याची स्थिती, कामकाज, हस्तांतरित झालेले ले-आऊट आदी मुद्यांवर शुक्रवारी मुंबईतील विधानभवनात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी बैठक बोलावली होती. पटोले यांनी या बैठकीत नासुप्रच्या कामकाजाचा आढावा घेत लेखाजोखा मागितला.
या बैठकीत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, विशेष मागास प्रवर्ग कल्याणमंत्री विजय वडेट्टीवार, आ. विकास ठाकरे, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, नासुप्र सभापती शीतल उगले यांच्यासह नगरसेविका विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनुसार नासुप्रच्या ५७२-१९०० लेआऊटमध्ये प्लॉट धारकांकडून डिमांड नोटच जारी करून गोळा झालेली रक्कम आणि ले-आ.ऊटच्या विकास कामांवर खर्च झालेली रक्कम याचा हिशोब मागण्यात आला आहे. यादरम्यान नासुप्रने शहरातील बाहेरच्या काही प्रोजेक्टसाठी आपल्या तिजोरीतून मदत केली आहे. अशा प्रोजेक्टची माहिती मागण्यात आली आहे.
विधानसभा अध्यक्ष पटोले यांनी म्हटले की, नासुप्रकडून अनेक योजनांचे काम मनपाला हस्तांतरित करण्यात आले आहे. त्यांच्या कामाला गती प्रदान करावी. मनपाला हस्तांतरित केलेल्या ले-आऊटची संख्या, तिथे झालेली विकास कामांची माहिती यादरम्यान मागण्यात आली आहे. या बैठकीत मनपामध्ये सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबतही चर्चा झाल्याची माहिती आहे.

Web Title: The Speaker of the Legislative Assembly asked for report of NIT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.