नागपूर हादरले... क्रिकेट सट्ट्यात पैसे हारल्याने मुलाची आत्महत्या, आईनेदेखील संपविले आयुष्य
By योगेश पांडे | Updated: May 22, 2023 16:46 IST2023-05-22T16:44:18+5:302023-05-22T16:46:27+5:30
छापरूनगरमध्ये दुर्दैवी घटना : सलग दुसऱ्या दिवशी ‘डबल आत्महत्या’

नागपूर हादरले... क्रिकेट सट्ट्यात पैसे हारल्याने मुलाची आत्महत्या, आईनेदेखील संपविले आयुष्य
नागपूर : क्रिकेट सट्ट्यात हारल्यामुळे प्रचंड आर्थिक फटका बसलेल्या एका तरुणाने नैराश्यातून आत्महत्या केली. दुर्दैवाची बाब म्हणजे त्याच्या मृत्यूची बातमी ऐकताच त्याच्या आईनेदेखील विष प्राशन करून आत्महत्या केली. केवळ काही तासांच्या अंतराने दोन्ही आई-मुलाने आयुष्य संपविल्याने छापरूनगर परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेडकर चौकाजवळ ही घटना घडली. खितेन नरेश वाघवानी (२०) असे मृतक मुलाचे नाव आहे तर दिव्या नरेश वाघवानी असे त्याच्या दुर्दैवी आईचे नाव आहे. कुटुंबियांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या माहितीनुसार खितेन हा विद्यार्थी होता व काही काळाअगोदर अगदी सरळ स्वभावाचा मुलगा होता. मात्र तो चुकीच्या संगतीत लागला व काही तरुणांमुळे क्रिकेट सट्ट्याकडे वळला.
मागील वर्षी तो सट्ट्यात काही पैसे हारला होता. मात्र ही बाब त्याने घरच्यांना सांगितली होती व त्याचे वडील ते पैसे हळूहळू देत होते. मात्र खितेनने यावर्षी परत मित्रांच्या सांगण्यावरून आयपीएलच्या सामन्यांवर पैसे लावले, त्यात तो हरला. सट्टेबाज पैशांसाठी त्रास देऊ लागले व यातून खितेन तणावात गेला. रविवारी रात्री त्याचे कुटुंबिय सिव्हील लाईन्समध्ये एका कार्यक्रमासाठी गेले होते. घरी कुणीच नसताना त्याने स्वयंपाकघरातील सिलिंग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. शेजारील कुटुंबाला तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्याला तातडीने खाली उतरवून एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकून आई दिव्या हिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिला प्रचंड मानसिक धक्का बसला व त्यांनी सकाळच्या सुमारास विषारी औषध प्राशन केले. कुटुंबीय जितेशच्या अंत्यसंस्काराच्या तयारीत असताना त्याच्या आईची प्रकृती खालावली. त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांनादेखील मृत घोषित केले. या प्रकारामुळे जितशेचे वडील व बहीण अक्षरश: कोलमडले असून परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. लकडगंज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आई-मुलावर सोबतच अंत्यसंस्कार
जितेशवर अगोदर दुपारी दीड वाजता अंत्यसंस्कार होणार होते. मात्र त्याच्या आईनेदेखील आत्महत्या केल्याने जमलेल्या नातेवाईकांना मोठा धक्का बसला. आई-लेकावर सायंकाळी गंगाबाई घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.