जंगलातील पाणीटंचाईला सौरऊर्जेवरील बोअरवेलचा आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:07 IST2021-03-15T04:07:59+5:302021-03-15T04:07:59+5:30
नागपूर : उन्हाळ्याच्या दिवसात जंगलातील पाणी आटते. प्राणी पाण्यासाठी व्याकुळ होतात. प्रसंगी गावात आणि शिवारातही शिरतात. हरिणासारखे प्राणी कुत्र्यांच्या ...

जंगलातील पाणीटंचाईला सौरऊर्जेवरील बोअरवेलचा आधार
नागपूर : उन्हाळ्याच्या दिवसात जंगलातील पाणी आटते. प्राणी पाण्यासाठी व्याकुळ होतात. प्रसंगी गावात आणि शिवारातही शिरतात. हरिणासारखे प्राणी कुत्र्यांच्या तावडीत सापडतात. अनेकदा शिकारही होते. त्याला सौरऊर्जा बोअरवेल हा उपाय ठरला आहे. ठिकठिकाणी केलेल्या बोअरवेलचे पाणी सौरऊर्जेने खेचून प्राण्यांना पुरविण्यावर चार ते पाच वर्षांपासून वनविभागाने भर दिल्याने जंगलातील पाणीटंचाई बऱ्यापैकी दूर झाली आहे.
कडक तापणारा उन्हाळा, बाष्पीभवन यामुळे जंगलातील ७५ टक्के जलस्रोत दरवर्षीच कोरडे पडतात. यावर उपाय म्हणून वनविभागाने कृत्रिम टँक तयार करून त्यात बोअरवेलने पाणी सोडण्याची व्यवस्था केली होती. काही ठिकाणी जंगलात टँकरने पाणीपुरवठा करून प्राण्यांची तहान भागविली जाते. मात्र, सौरऊर्जेवर चालणारे बोअरवेल आता यावर प्रभावी उपाय ठरला आहे. ही पर्यायी नव्हे, संपूर्ण २४ तासांची व्यवस्था आहे. २४ तास वॉटर होलमधून पाणी झिरपत राहील व त्यावर प्राणी आपली तहान भागवू शकतील, अशी सुविधा असल्याने वनार्मचाऱ्यांवरील ताण बराच कमी झाला आहे.
काही ठिकाणच्या तयार केलेल्या वॉटर होलमध्ये बोअरवेलमधून पाणी पडते. ते हाताने हलवावे लागते. त्यामुळे पाणी पूर्णवेळ राहत नाही. भूगर्भातील जलस्रोत खोलवर असल्यास जंगलात तयार केलेल्या कृत्रिम वाॅटर होलमध्ये कर्मचारी हँडपंपच्या मदतीने पाणी भरतात. मात्र, हा पर्याय सुविधाजनक नसून, त्यात धोकाही तेवढाच आहे. बरेचदा मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे हे काम प्रभावित होण्याचा धोका आहे.
अलीकडेच यासंदर्भात पेंच प्रकल्पात बैठक झाली. त्यात मुख्य वनसंरक्षक रविकिरण गोवेकर यांनी आढावा घेतला. नागपुरातील तिन्ही वन्यजीव क्षेत्रात यंदा पाण्याची टंचाई भासणार नसल्याचे सांगण्यात आले. आवश्यक तिथे वाढीव सौरऊर्जा बोअरवेल उभारण्याच्या आणि बोअरवेल दुरुस्तीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागपूर जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये १५० नैसर्गिक जलस्रोत आहेत. यात ११० सोलर पंप असून, ४० हातपंप आहेत. नव्याने १० सोलर पंप उभारले जातील. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये १०० बोअरवेल असून, ते सर्वच सौरऊर्जेवर चालणारे असल्याची माहिती ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तथा वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली आहे.
...
पाण्याची कमतरता असलेल्या ठिकाणी मॉनिटरिंग केले जाईल. जंगलात अनेक ठिकाणी सोलर पंप आहेत. आवश्यक तिथे दुरुस्तीच्या तसेच वाढीव पंपासाठी सूचना दिल्या आहेत. शक्यतो नैसर्गिक स्रोतावर वनविभागाचा भर आहे.
- नितीन काकोडकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)
...