सामाजिक चळवळींचे ‘नेताजी’ हरविले

By Admin | Updated: July 19, 2014 02:23 IST2014-07-19T02:23:50+5:302014-07-19T02:23:50+5:30

जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते माजी आमदार नेताजी

The social movement lost 'Netaji' | सामाजिक चळवळींचे ‘नेताजी’ हरविले

सामाजिक चळवळींचे ‘नेताजी’ हरविले

नेताजी राजगडकर यांचे निधन : वैदर्भीयांनी व्यक्त केली हळहळ
नागपूर :
जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते माजी आमदार नेताजी राजगडकर यांचे शुक्रवारी नागपुरात निधन झाले. गेले काही दिवस नेताजींची प्रकृती खालावली होती. काही दिवसांपूर्वी त्यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला. त्यामुळे आॅरेंज सिटी रुग्णालयात त्यांना भरती करण्यात आले. तब्बल चार महिन्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. ते नक्की यातून पूर्णपणे सावरतील असा विश्वास त्यांच्या चाहत्यांना असतानाच त्यांची प्राणज्योत सकाळी ९.३० वाजता मालवली. ही दु:खदायक बातमी कळताच वर्धा मार्गावरील स्नेहनगर येथील त्यांच्या निवासस्थानी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांच्या घरी धाव घेतली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा संकेत आणि मुलगी मिताली तसेच बराच मोठा आप्तपरिवार आहे. नेताजी म्हणजे सळसळता उत्साह. प्रचंड ऊर्जेने काम करणारा हा माणूस कुठल्याही सामाजिक कामासाठी हिरीरीने समोर असायचा. समाजातले दु:ख, वेदना आणि लोकांचे अश्रु पुसण्यासाठी सातत्याने पुढाकार घेणारे नावाने आणि कर्मानेही नेताजीच होते. आज अचानक नेताजी राजगडकर यांच्या निधनाची बातमी आली आणि सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांना धक्का बसला. नेताजींची आज गरज होती, त्यांचे मार्गदर्शन हवे होते, अनेकांना त्यांचा आधार होता आणि अनेक चळवळींचे प्रेरणास्थान ते होते. त्यांच्या निधनाने सामाजिक चळवळींचे ‘नेताजी’ हरपल्याची शोकसंवेदना मान्यवरांनी व्यक्त केली. त्यांच्या पार्थिवावर सहकार नगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी रोजगार हमी योजना मंत्री नितीन राऊत, डॉ. यशवंत मनोहर, श्रीनिवास खांदेवाले, श्रीपाद भालचंद्र जोशी, डॉ. प्रमोद मुनघाटे, प्रा. रणजीत मेश्राम, प्रकाश खरात, मारोतराव कांबळे, भाऊ लोखंडे, लोकनाथ यशवंत व ताराचंद खांडेकर यांच्यासह आदी उपस्थित होते.
नेताजींचा जन्म १५ जानेवारी १९५० साली यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील मानकी या छोट्याशा गावात झाला. वणीच्या जनता विद्यालयात त्यांचे शालेय शिक्षण झाले. त्यानंतर लोकमान्य टिळक महाविद्यालयातून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले.
नेताजी राजगडकर बातम्या देत आहेत...!
नागपूर आकाशवाणीचा तो काळ भारलेला होता. घराघरात रेडिओ ऐकला जायचा. त्या काळात हे आकाशवाणी नागपूरचे अ केंद्र आहे. आता आपल्याला नेताजी राजगडकर बातम्या देत आहे. ऐकूयात... क ाही ठळक बातम्या. हा त्यावेळचा श्रोत्यांशी त्यांनी साधलेला संवाद आजही जुन्या श्रोत्यांच्या स्मरणात आहे. त्यांचा भारदस्त आवाज आणि स्पष्ट उच्चार. बातम्या सांगण्याची त्यांची स्वतंत्र शैली हा त्यावेळी त्यांच्याभोवती ग्लॅमर उभे करणारा होता. नेताजींशी आपला संबंध आहे, हे सांगताना लोकांना अभिमान वाटायचा. १९८० ते ९० चे दशक त्यांनी आकाशवाणीवर वृत्तनिवेदक म्हणून गाजविले.

Web Title: The social movement lost 'Netaji'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.