योगेश पांडे
नागपूर : मागील काही काळापासून नागपुरात सायबर गुन्हेगारीत वाढ झाला असून पोलिसांना टेक्नोसॅव्ही होणे ही काळाची गरज झाली आहे. सायबर गुन्ह्यांच्या तपासात मदत व्हावी व आक्षेपार्ह पोस्टवर बारीक नजर असावी यासाठी पोलिसांसाठी सायबर लॅब व सोशल मीडिया लॅब तयार करण्यात आली आहे. या लॅबच्या माध्यमातून डिजिटल पुरावे एकत्रित करण्यात मोठी मदत मिळणार आहे.
देशविदेशात बसून सायबर गुन्हेगार फसवणूक, छळवणूक, सामाजिक तेढ निर्माण करणे इत्यादी गुन्हे करत असतात. सायबर सुरक्षेबाबत हवी तशी जागृती नसल्याने लोकदेखील गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकतात. यातून अनेकांच्या कष्टाचे पैसे गुन्हेगारांच्या घशात जातात. तसेच सोशल मीडियाचा वापर करून आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करून जातीय तेढ निर्माण करण्याचे प्रयत्नदेखील होताना दिसून येतात. सायबर गुन्ह्यांमध्ये डिजिटल पुरावे गोळा करणे ही फार महत्त्वाची प्रक्रिया असते. हीच बाब डोळ्यासमोर ठेवून सायबर लॅब व सोशल मीडिया लॅब उभारण्यात आल्या आहेत. याच्या माध्यमातून गुन्ह्यांचा तपास वेगाने होण्यात मदत मिळणार आहे. तसेच डिजिटल पुरावे गोळा करून आरोपींचा शोध घेणेदेखील सोपे होणार आहे. सोशल मीडिया लॅबअंतर्गत गरुड दृष्टी सॉफ्टवेअर ॲपच्या मदतीने सोशल माध्यमांवर वॉच ठेवण्यात येईल.
या टूल्सचा होणार उपयोग
सायबर लॅबमध्ये पोलिसांकडून सेलीब्राइट रिस्पाॅन्डर, सेलीग्राईट डिजिटल कलेक्टर, टॅब्ल्यु टीएक्स वन, टॅब्ल्यु टी ३५, टॅब्ल्यु टी ८ या टूल्सचा उपयोग करण्यात येणार आहे.