...तर थेट कार्यालये सील करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:07 IST2021-04-19T04:07:59+5:302021-04-19T04:07:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - कोरोनाचे संकट दिवसेंदिवस विक्राळ रूप धारण करीत आहे. बाधित तसेच मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत ...

...तर थेट कार्यालये सील करणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - कोरोनाचे संकट दिवसेंदिवस विक्राळ रूप धारण करीत आहे. बाधित तसेच मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. अशातही काही बेशिस्त मंडळी जुमानत नसल्याने पोलिसांनी अधिक कठोर धोरण राबविण्याचे ठरवले आहे. या पार्श्वभूमीवर, खासगी कार्यालयांत नियमांचे उल्लंघन होताना दिसल्यास ते कार्यालयच सील करण्याचा इशारा पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी आज दिला आहे.
कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीबाबत आणि पोलिसांच्या भूमिकेबाबत त्यांनी रविवारी सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, खासगी कार्यालयांमध्ये कोविड नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे प्रत्येक पोलीस स्टेशन हद्दीमध्ये किती खासगी कार्यालये आहेत, त्यांची यादी तयार करण्यात आली आहे. या कार्यालयांचा जबाबदार अधिकारी कोण, त्याचे नाव, मोबाइल क्रमांकाची नोंद यादीत आहे. कोविड नियमानुसार कार्यालयात क्षमतेपेक्षा जास्त अधिकारी, कर्मचारी आढळून आल्यास जबाबदार अधिकाऱ्याविरुद्ध साथरोग कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. याशिवाय, खासगी कार्यालयांत येण्याची वेळ सकाळी १० वाजतापर्यंत आहे. या कालावधीनंतर रस्त्यावर आढळणाऱ्या खासगी कार्यालयांतील कर्मचाऱ्यांविरुद्धही गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. यात अर्ध्या तासाची सूट देण्यात येईल, असे सांगतानाच कर्मचाऱ्यांनी कार्यालयात वेळेवर जावे, असे आवाहनही अमितेशकुमार यांनी केले आहे.
आतापावेतो पोलीस समुपदेशकाच्या भूमिकेत होते. नागरिक जुमानत नसल्याने पोलीस आक्रमक झाले आहेत. वेगवेगळे कारण सांगून ते घराबाहेर फिरत असल्यामुळे या गर्दीतील सुपर स्प्रेडर्सची नाकाबंदीच्या ठिकाणीच रॅपिड ॲण्टिजेन टेस्ट केली जात आहे.
---
हे खपवून घेतले जाणार नाही
सद्य:स्थितीत बहुतांश रुग्णालयांतील डॉक्टर आणि कर्मचारी अहोरात्र सेवा देत आहेत. त्यांच्यावर प्रचंड ताण आला असतानादेखील ते रुग्णांची सेवा करीत आहेत. काही ठिकाणी रुग्णांचे नातेवाईक डॉक्टर व हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांशी वाद घालून त्यांना धमक्या, शिवीगाळ आणि मारहाण करीत असल्याचे पुढे आले आहे. हा प्रकार संतापजनक आहे. तो अजिबात खपवून घेतला जाणार नाही. डॉक्टर अथवा कर्मचाऱ्यांशी भांडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असेही पोलीस आयुक्त म्हणाले.
---
...तर आम्हाला तक्रार करा
खासगी कार्यालयांच्या तक्रारी येत आहेत. कार्यालयांत नियमभंग होत असल्यास कर्मचाऱ्यांनी पोलीस नियंत्रण कक्ष किंवा संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार करावी. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल आणि नियमांचे पालन न करणारी खासगी कार्यालये सील करण्यात येतील, असेही अमितेशकुमार यांनी स्पष्ट केले.
-----