...तर पोलीस महिलांना रात्री घरापर्यंत सोडतील! नागपूर पोलिसांचा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2019 00:45 IST2019-12-04T00:45:20+5:302019-12-04T00:45:28+5:30
महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेता, महिलांच्या सुरक्षेसाठी नागपूर पोलिसांनी मदतीचा हात दिला आहे.

...तर पोलीस महिलांना रात्री घरापर्यंत सोडतील! नागपूर पोलिसांचा उपक्रम
नागपूर : महिलांनो, तुम्ही कर्तव्यावरून अथवा कुठल्या कामावरून रात्री घरी परतताय. तुम्हाला घरापर्यंत पोहचताना असुरक्षित वाटतेय. खूप उशीर झालाय, संकटात सापडलात. घाबरू नका. तुमच्या मदतीसाठी तातडीने महिला पोलीस धावून येतील आणि तुम्हाला घरापर्यंत सुखरुप पोहचवतील. त्यासाठी तुम्हाला केवळ पोलीस नियंत्रण कक्षातील १०० नंबर अथवा ०७१२-२५६१२२२ हा नंबर डायल करायचा आहे. हैदराबादेतील घटनेच्या धर्तीवर नागपूर पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने हे अभिनव पाऊल उचलले आहे.
महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेता, महिलांच्या सुरक्षेसाठी नागपूर पोलिसांनी मदतीचा हात दिला आहे. शहरातील कुठल्याही भागात रात्री ९ नंतर एकट्या महिलेला घरी जाण्यासाठी वाहतुकीचे साधन मिळत नसेल तर पोलीस नियंत्रण कक्षातील संबंधित क्रमांकावर संपर्क करायचा आणि माहिती द्यायची आहे.
महिलेला घरी पोहचविल्यानंतर कंट्रोल रुमला महिला पोलीस रिपोर्टसुद्धा देतील. यासंदर्भात सोमवारी नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी सर्वच पोलीस स्टेशनला निर्देश दिले आहेत. पोलीस आयुक्तांचे पत्र पोहोचल्यानंतर बहुतांश ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांनी नियुक्तीही केली आहे.
सर्व ठाण्यांना निर्देश
पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय म्हणाले की, रात्री ९ नंतर एकट्या महिलेला वाहतुकीचे साधन मिळत नसेल तर त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क करावा. त्यांना पोलीस घरापर्यंत सुरक्षित पोहचविणार. त्यासाठी सर्वच ठाण्याला आवश्यक निर्देश दिले आहे.