...तर, मध्य प्रदेशातील एकही बस नागपुरात येऊ देणार नाही

By नरेश डोंगरे | Updated: July 17, 2025 19:14 IST2025-07-17T17:45:16+5:302025-07-17T19:14:15+5:30

Nagpur : श्री नागद्वार स्वामी यात्रेला जाण्यासाठी एस.टी. बससेवेस परवानगी न दिल्यास, मध्य प्रदेशातून कोणतीही बस नागपूरमध्ये येऊ देणार नाही

...so, no bus from Madhya Pradesh will be allowed to enter Nagpur | ...तर, मध्य प्रदेशातील एकही बस नागपुरात येऊ देणार नाही

...so, no bus from Madhya Pradesh will be allowed to enter Nagpur

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
१९ जुलैपासून सुरू होणाऱ्या श्री नागद्वार स्वामी यात्रेला जाण्यासाठी एस.टी. बससेवेस परवानगी न दिल्यास, मध्य प्रदेशातून कोणतीही बस नागपूरमध्ये येऊ देणार नाही, असा इशारा आज शिवसेनेने (शिंदे गट) दिला आहे.

मध्य प्रदेशातील पचमढी नागद्वार यात्रा नागपूर, विदर्भातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. नागपूर-विदर्भातून दरवर्षी गणेशपेठ बसस्थानकातून पचमढी (मध्य प्रदेश) येथील नागद्वार यात्रेसाठी जातात. मात्र यंदा यात्रा सुरू होण्याला केवळ काही तासांचा अवधी उरला असताना अजूनही मध्य प्रदेश प्रशासनाकडून एसटी महामंडळाच्या बसेसना परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे भाविकांमध्ये रोष निर्माण झाला आहे.

विशेष म्हणजे, एसटीला परवानगी नाकारणाऱ्या मध्य प्रदेश परिवहन प्राधिकरणाने ट्रॅव्हल्सना मात्र परवानगी दिली आहे. या संबंधाने लोकमतने वृत्त प्रकाशित करताच शिंदे सेना आक्रमक झाली. या पार्श्वभूमीवर, शिंदे सेनेचे शहर प्रमूख धिरज फंदी यांच्या नेतृत्वात शिंदे सेनेच्या शिष्टमंडळाने आज विभागीय वाहतूक अधिकारी रंजू घोडमारे यांची भेट घेतली. त्यांना एक निवेदन देण्यात आले.

श्री नागद्वार स्वामी पचमढी यात्रेसाठी भाविकांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसेसना मध्यप्रदेश प्रशासनाकडून परवानगी मिळाली नाही तर मध्यप्रदेशमधील एकही बस नागपुरात येऊ देणार नाही, असा ईशारा त्यांनी यावेळी दिला. शिष्टमंडळात फंदी यांच्यासोबत, माजी नगरसेवक समीर शिंदे, गणेश डोईफोडे, नरेश मोहाडीकर, पापा बैरीकर, दिनेश मोहल्ले, प्रतीक मेश्राम, पलाश कावरे, अनिल गोडबोले, दीपक दादुरे आणि बंडू बेले आदींचा समावेश होता.

भाविकांमध्येही रोष

यात्रा जत्रेच्या वेळी प्रवाशांची गर्दी होत असल्याचे बघून खासगी बस अर्थात ट्रॅव्हल्सवाले मनमानी पद्धतीने भाडे आकारतात. याऊलट एसटीचे प्रवास भाडे स्वस्त असते आणि प्रवासही सुरक्षित असतो. त्यामुळे खास करून ग्रामीण भागातील प्रवासी एसटीवर विश्वास दाखवितात. आता एमपी प्रशासनाने ट्रॅव्हल्सला हा आणि एसटीला ना म्हटल्यामुळे प्रवाशांमध्येही रोष निर्माण झाला आहे.

२४ तासात तोडगा निघावा, अन्यथा... !
नागद्वार यात्रा सुरू व्हायला केवळ एक दिवस शिल्लक आहे. उद्या सायंकाळपर्यंत एसटी बससेवेच्या परवानगीचा तिढा सुटला नाही, तर एसटीचे लाखोंचे नुकसान होईल. परिणामी दोन्ही राज्यांतील वाहतुकीच्या संदर्भाने संघर्ष निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संबंधाने एसटीच्या अधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहे.
 

Web Title: ...so, no bus from Madhya Pradesh will be allowed to enter Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.