चक्क दुचाकीवरून देशी दारूच्या २०० बाटल्यांची तस्करी, आरोपींना अटक
By योगेश पांडे | Updated: May 10, 2024 15:36 IST2024-05-10T15:34:45+5:302024-05-10T15:36:08+5:30
Nagpur : गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एकच्या पथकाने बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत केली ही कारवाई

Smuggling of 200 bottles of 'Desi' liquor on bike, accused arrested
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दुचाकीवरून देशी दारूची तस्करी करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित आरोपी दुचाकीवरून २०० दारूच्या बाटल्या नेत होते. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एकच्या पथकाने बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई केली.
मनीषनगरातील महाकाली नगर येथील रहिवासी धनराज केशव वर्मा (२१ वर्ष) व सोनू रम्मत वर्मा (२५) अशी आरोपींची नावे आहेत. दोघेही मूळचे वर्धा जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील दरीगाव येथील आहेत.
गुरुवारी रात्रीच्या सुमारास गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना खबऱ्यांच्या नेटवर्कमधून मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी उत्कर्ष कॉम्प्लेक्स समोर एम.एच ३१ ई. झेड ३०७३ या दुचाकीला थांबवले.. दुचाकीची झडती घेतली असता आरोपींकडे देशी दारूच्या २०० बाटल्या आढळल्या. त्यांना त्याच्या परवान्याबाबत विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखविल्यावर त्यांनी त्या बाटल्या मुद्देमाल राजत वाईन शॉपच्या मालकाच्या असल्याचे सांगीतले. आरोपींकडून दारूच्या बाटल्या, मोटरसायकल व मोबाईल जप्त करण्यात आले. त्यांना बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले. पोलीस निरीक्षक सुहास चौधरी, विनोद देशमुख, रितेश तुमडाम, चंद्रशेखर भारती, रविन्द्र राऊत यांच्या पथकाने ही कारवाई केली.