तासभर धुव्वाधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 01:38 IST2017-08-28T01:37:20+5:302017-08-28T01:38:14+5:30
गणेशोत्सवाची सर्वत्र धामधूम सुरू असतानाच रविवारी दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह शहरात जोरदार पाऊ स पडला.

तासभर धुव्वाधार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गणेशोत्सवाची सर्वत्र धामधूम सुरू असतानाच रविवारी दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह शहरात जोरदार पाऊ स पडला. काही ठिकाणी पाणी तुंबले. ठिकठिकाणी झाडे पडली. पावसामुळे गणेश भक्तांची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र हवामान विभागाकडे रविवारी रात्री ८ पर्यत ९.४ मि.मी. पावसाचीच नोंद करण्यात आली आहे. राजभवन पाण्याच्या टाकीजवळ व जरीपटका येथील दयालू सोसायटी व महाल भागातील चिटणवीस पार्क जवळील रिसालदार गल्ली आदी ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या.
जोराच्या पावसामुळे सदर, काँटन मार्केट चौक, बसस्थानक, मेडिकल चौक, जरीपटका, जयताळा आदी भागातील रस्त्यांवर काहीवेळ पाणी साचले होते.
झिंगाबाई टाकळी भागातील बाबा फरीदनगर येथील खोब्रागडे यांच्या घरात पाणी शिरले होते. अग्निशमन विभागाच्या जवानांनी खोब्रागडे यांच्या घरात साचलेले पाणी बाहेर काढले. शहरात ठिकठिकाणी पाणी तुंबले होते. परंतु पाऊ स थांबल्याने साचलेले पाणी वाहून गेल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. रहदारीला फारसा अडथळा झाला नाही. मात्र काहीवेळ रस्त्यावर पाणी साचल्याने वाहन चालकांना रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने ठिकठिकाणी किरकोळ अपघाताच्या घटना घडल्या. गणेशोत्सव व रविवार असल्याने बाजारात खरेदीसाठी गर्दी होती. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या ४८ तासात नागपूर शहर व परिसरात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.