स्मिता पाटील यांच्या स्मृती अजरामर
By Admin | Updated: December 15, 2015 05:08 IST2015-12-15T05:08:38+5:302015-12-15T05:08:38+5:30
दिवंगत प्रतिभावंत अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या स्मिता पाटील यांच्या स्मृती अजरामर आहेत. भारतीय

स्मिता पाटील यांच्या स्मृती अजरामर
पृथ्वीराज चव्हाण यांचे मत : धुरट, भाकरे यांना स्मिता स्मृती पुरस्कार प्रदान
नागपूर : दिवंगत प्रतिभावंत अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या स्मिता पाटील यांच्या स्मृती अजरामर आहेत. भारतीय कलाविश्वावर छाप पाडणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची आठवण सतत काढली जाईल, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. ते सोमवारी स्मिता-स्मृती पुरस्कार प्रदान कार्यक्रमात बोलत होते.
यावर्षी १९७६ पासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत व हुंडाविरोधी आघाडी, एक गाव एक पाणवठा, शेतमजूर संघटना इत्यादी चळवळीत सक्रिय सहभाग असलेले डॉ. हरीश धुरट यांना सामाजिक क्षेत्र तर, रंगभूमीवर दिग्दर्शक व नट म्हणून ठसा उमटविणारे संजय भाकरे यांना रंगभूमी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी चव्हाण यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. भारतीय सेन्सॉर बोर्डचे अध्यक्ष पहलाज निहलानी अध्यक्षस्थानी तर, विधान परिषदेचे उपसभापती वसंतराव डावखरे, स्मिता पाटील यांचे वडील माजी मंत्री शिवाजीराव पाटील व चिरंजीव अभिनेता प्रतीक बब्बर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. शंकरनगरातील राष्ट्रभाषा संकुलस्थित श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृह येथे हा कार्यक्रम पार पडला. हा पुरस्कार विदर्भ गौरव प्रतिष्ठानतर्फे सामाजिक व रंगभूमी या क्षेत्रातील प्रत्येकी एका व्यक्तीला दरवर्षी प्रदान करण्यात येतो.
स्मिता पाटील समांतर चित्रपटांतील दमदार अभिनयामुळे नावारूपास आल्या होत्या. त्यांचे मंथन, भूमिका, आक्रोश इत्यादी चित्रपट गाजले. त्यांच्या उल्लेखाशिवाय समांतर चित्रपटाची चर्चाच होऊ शकत नाही. व्यावसायिक चित्रपटात अभिनय करणे त्यांनी आव्हान म्हणून स्वीकारले होते. त्यांच्या स्मृतिनिमित्त दिला जाणाऱ्या पुरस्काराला विदर्भात मान आहे, असे चव्हाण यांनी सांगून पुरस्काराचे मानकरी भविष्यातही चांगले कार्य करीत राहतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. स्मिता पाटील अभिनयसंपन्न अभिनेत्री होत्या. त्यांनी मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांच्या चिरंजीवाने अभिनयाचा वारसा पुढे चालवून यश संपादित करावे, असे डावखरे यांनी सांगितले.
स्मिता पाटील चांगल्या अभिनेत्रीसह चांगल्या व्यक्तीही होत्या. त्यांना सामाजिक जबाबदारीची जाणीव होती. त्या चित्रपट निर्मात्याच्या अडचणी समजून घेत होत्या. एकदा त्यांनी जखमी असतानाही ‘कसम पैदा करने वाले की’ चित्रपटाचे चित्रीकरण थांबविले नव्हते, या आठवणीला निहलानी यांनी उजाळा दिला.
डॉ. धुरट यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. देशात धर्म व जातीवरून विषमता वाढत असल्याचे व शासनाला भांडवलदारांची जास्त चिंता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. व्यासपीठावर माजी आमदार नितीन राऊत, ज्येष्ठ पत्रकार एस. एन. विनोद, प्रतिष्ठानचे डॉ. गिरीश गांधी, प्रफुल्ल गाडगे, अनंतराव घारड, दिलीप जाधव उपस्थित होते. प्रा. कोमल ठाकरे यांनी संचालन केले.(प्रतिनिधी)
माँ जैसे बनना है - प्रतीक बब्बर
४जीवनात ‘माँ जैसा अच्छा इन्सान व अभिनेता बनना है’ असे प्रतीक बब्बरने सांगितले. कार्यक्रमात बोलताना तो भावुक झाला होता. मी जन्म होताच आईला गमावले. यामुळे तिला जवळून पाहता आले नाही. तिचे प्रेम मला मिळाले नाही. परंतु, लहानपणापासूनच तिचे कौतुक ऐकत आलो आहे. तिच्यासंदर्भात सर्वजण चांगले बोलतात. ती चांगली कलावंत व चांगली व्यक्ती होती. ती सर्वांना प्रेम देत होती. देवाने आईला पाहू दिले नाही. पण तिच्या वाट्याचे प्रेम मला लोकांकडून मिळत आहे, अशा भावना प्रतीकने व्यक्त केल्या. त्याला ऐकताना सभागृह स्तब्ध झाले होते.
अभिनयाशी संबंध नव्हता - शिवाजीराव पाटील
४स्मिता पाटील यांचा अभिनयाशी काहीच संबंध नव्हता. त्यांनी अभिनयाचे शिक्षणही घेतले नव्हते. त्या लहानपणी केवळ सेवादलाच्या लोकरंजनातून लोकशिक्षण कार्यक्रमात काम करीत होत्या, असे शिवाजीराव पाटील यांनी सांगितले. स्मिता पाटील अभिनय क्षेत्रात येण्यास एक अपघात कारणीभूत ठरला. त्या मोठ्या बहिणीला भेटायला मुंबईला गेल्या होत्या. दरम्यान, त्यांनी सहज म्हणून ‘न्यूज रीडर’ची चाचणी दिली व त्यांची निवड झाली. यानंतर श्याम बेनेगल यांनी त्यांना चित्रपटात संधी दिली, अशी माहितीही पाटील यांनी दिली.