शेअर बाजारात छोटे गुंतवणूकदार परत येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 23:31 IST2018-02-06T23:29:56+5:302018-02-06T23:31:17+5:30
अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेअर बाजाराचा निर्देशांक आणि निफ्टीमध्ये प्रचंड घसरण झाली. ही घसरण दीर्घकालीन भांडवली उत्पनाच्या नफ्यावर १० टक्के कर लावल्यामुळे नव्हे तर जागतिक शेअर बाजारातील अस्थिर वातावरणामुळे झाली आहे. ती अल्पकालीन असून छोटे गुंतवणुकदार शेअर बाजारात पुन्हा परत येतील, असा विश्वास मुंबई येथील नामांकित सीए केतन वजानी यांनी व्यक्त केला.

शेअर बाजारात छोटे गुंतवणूकदार परत येणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेअर बाजाराचा निर्देशांक आणि निफ्टीमध्ये प्रचंड घसरण झाली. ही घसरण दीर्घकालीन भांडवली उत्पनाच्या नफ्यावर १० टक्के कर लावल्यामुळे नव्हे तर जागतिक शेअर बाजारातील अस्थिर वातावरणामुळे झाली आहे. ती अल्पकालीन असून छोटे गुंतवणुकदार शेअर बाजारात पुन्हा परत येतील, असा विश्वास मुंबई येथील नामांकित सीए केतन वजानी यांनी व्यक्त केला.
जैन इंटरनॅशनल ट्रेड आॅर्गनायझेशन, नागपूरतर्फे (जीतो) अर्थसंकल्पावर विश्लेषणात्मक कार्यक्रमाचे आयोजन चिटणवीस सेंटरमध्ये मंगळवारी करण्यात आले. त्यावेळी आयकरातील तरतुदींवर वजानी बोलत होते. व्यासपीठावर पुणे येथील सीए जयदीप मर्चंट, ‘जीतो’ नागपूरचे उपाध्यक्ष नितीन खारा, सचिव प्रतीक सरावगी, वित्त समितीचे चेअरमन व कार्यक्रमाचे समन्वयक सीए जुल्फेश शाह, बिझनेस व लॉ समितीचे चेअरमन अश्विन शाह उपस्थित होते.
वजानी म्हणाले, सरकारच्या घोषणांमुळे गुंतवणूकदार भयभीत आहेत. बाजाराचा कल पाहूनच व्यवहार करणे उचित राहील. व्यापारी-उद्योजक आणि लोकांना अपेक्षित बजेट सरकारने मांडला नाही, अशी ओरड आहे. सरकारने सुरक्षा व्यवहार कर (एसटीटी) न हटविता दीर्घकालीन भांडवली नफ्यावर १० टक्के कराची तरतूद केली. त्यामुळे शेअर बाजारात व्यवहार करणाºयांना दुहेरी कर भरावा लागेल. ही तरतूद १ एप्रिल २०१८ पासून आहे. हा कर कशा पद्धतीने भरावा, यावर त्यांनी व्हिडिओ सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
अप्रत्यक्ष करावर माहिती देताना सीए जयदीप मर्चंट म्हणाले, विदेशी गुंतवणूकदारांनी समभागांची विक्री केल्यामुळे ही स्थिती ओढावली. घरगुती कंपन्यांनी खरेदी केल्यास बाजार स्थिर राहील. घरगुती गुंतवणूकदारांनी वर्ष २०१७ मध्ये शेअर बाजारात दोन लाख कोटींची गुंतवणूक केली आहे. यावर्षीही केल्यास बाजारात सकारात्मक परिणाम दिसून येतील. बाजारात पूर्वीप्रमाणेच उत्साह दिसून येईल.
जुल्फेश शाह म्हणाले, अर्थसंकल्पात १ आॅगस्ट २०१४ नंतर लाँग टर्म कॅपिटल गेनवर कराची तरतूद केली आहे. सध्याच्या दुहेरी कर प्रणालीमुळे लहान गुंतवणूकदार संभ्रमात आहेत. याद्वारे सरकारकडे ३० हजार कोटी कर गोळा होणार आहे. याशिवाय इक्विटी व म्युच्युअल फंडाच्या उत्पन्नावर १० टक्के कर आकारला आहे. आयकरात ५५ सुधारणा केल्या आहेत. त्याचा परिणाम करदात्यांवर होणार आहे.
प्रास्ताविक नितीन खारा यांनी केले तर शाह यांनी संचालन व आभार मानले. यावेळी जीतो नागपूरचे उपाध्यक्ष रजय सुराणा आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.