सलूनमध्ये कटिंग करायला बसले अन गुन्हेगाराने विनाकारण चाकूने वार केले
By योगेश पांडे | Updated: May 9, 2024 14:31 IST2024-05-09T14:30:34+5:302024-05-09T14:31:28+5:30
Nagpur : 'मला ओळखत नाही का, मी आत्ताच खून केला असून जेलमधून सुटून आलो आहे' म्हणत दिली धमकी

Sitting for cutting in the salon, the criminal stabbed him for no reason
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सलूनमध्ये कटिंग करण्यासाठी बसलेल्या एका व्यक्तीवर सराईत गुन्हेगाराने विनाकारण शिवीगाळ करत चाकूने वार केले. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
प्रवीण ईश्वर रघटाटे (३२, खैरी गाव, नवीन कामठी) असे तक्रारदाराचे नाव आहे. ८ मे रोजी नऊ वाजताच्या सुमारास ते भिलगाव येथील हरीअर हेअर ड्रेसर्समध्ये कटिंग करण्यासाठी गेले होते. ते खुर्चीवर बसले असता शेख अल्फाज उर्फ औजाज उर्फ जलील उर्फ सूरज शामलाल कांबळे (२५, भिलगाव) हा तेथे आला. त्याच्या हातात चाकू होता व त्याने विनाकारण पाठीमागून येत रघटाटे यांची कॉलर पकडली. रघटाटे यांनी सलून मालकाला हा काय प्रकार आहे अशी विचारणा केली असता, अल्फाजने शिवीगाळ सुरू केली. मला ओळखत नाही का, मी आत्ताच खून केला असून जेलमधून सुटून आलो आहे असे म्हणत रघटाटे यांच्या मानेवर चाकूने वार केला. रघटाटे वाकल्याने त्यांच्या खांद्यावर उलटा चाकू लागला. रघटाटे तेथून घाबरून पळाले असता आरोपीने त्यांचा पाठलाग केला. रघटाटे जवळील एका घरात लपून बसले. आरोपी तेथून निघून गेला. त्यानंतर रघटाटे यांनी यशोधरानगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. आरोपीविरोधात याअगोदर खुनाचा प्रयत्न, चोरी, दरोडा, मारहाण असे गुन्हे दाखल आहेत.