उमरेड-कऱ्हांडलात एकाच वेळी ७ वाघांचे दर्शन; फाेटाे साेशल मीडियावर व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2023 10:58 IST2023-11-09T10:57:20+5:302023-11-09T10:58:49+5:30
सूर्या वाघ व फेरी नामक वाघिणीच्या कुटुंबाचे छायाचित्र

उमरेड-कऱ्हांडलात एकाच वेळी ७ वाघांचे दर्शन; फाेटाे साेशल मीडियावर व्हायरल
नागपूर : जंगल भ्रमंती करताना बहुतेक पर्यटकांसाठी वाघ हेच मुख्य आकर्षण असते. सफारी करताना कधी एखादा वाघ दिसला तर पर्यटकांचे मन प्रसन्न हाेते. मात्र विचार करा की जंगल सफारी करताना एकाच वेळी अर्ध्या डझनाच्या वर वाघ दिसले तर कुणाच्याही आनंदाला पारावार उरणार नाही. असाच एक प्रसंग नुकताच उमरेड-पवनी-कऱ्हांडला वन्यजीव अभयारण्यात फिरणाऱ्या पर्यटकांनी अनुभवला. या पर्यटकांना एकाच वेळी ७ वाघांचे कुटुंब बघायला मिळाले.
साेशल मीडियावर एकाच वेळी ७ वाघ दिसणारे छायाचित्र ताडाेबामधील असल्याचा दावा करीत शेअर केले जात आहे. हा फाेटाे साेशल मीडियावर वेगाने व्हायरल हाेत आहे. मात्र ताडाेबात कुठल्या ठिकाणी हा फाेटाे घेतला, हे स्पष्ट करण्यात आले नाही. दरम्यान, वन्यजीव तज्ज्ञांनी हे छायाचित्र उमरेड-कऱ्हांडला जंगलातील असून ताडाेबाशी काहीही संबंध नाही, असा दावा केला आहे. या छायाचित्रात ७ वाघ एका जलस्राेताजवळ मुक्तविहार करताना दिसत आहेत. हे सूर्या वाघ व फेरी नामक वाघिणीच्या कुटुंबाचे छायाचित्र आहे, ज्यामध्ये ५ शावक व २ वयस्क नर-मादी वाघ दिसून येत आहेत.