चांदीत ८ दिवसांत २६ हजारांची घसरण; सोन्याच्या दरालाही मोठा फटका, १ दिवसात ११ हजारांनी उतरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 06:38 IST2025-10-23T06:34:39+5:302025-10-23T06:38:43+5:30
चांदी आणि सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांत झालेली प्रचंड घसरण गुंतवणुकदारांसाठी चिंता वाढविणारी ठरली.

चांदीत ८ दिवसांत २६ हजारांची घसरण; सोन्याच्या दरालाही मोठा फटका, १ दिवसात ११ हजारांनी उतरले
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : नागपूरच्या सराफा बाजारात चांदी आणि सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांत झालेली प्रचंड घसरण गुंतवणुकदारांसाठी चिंता वाढविणारी ठरली. आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर, मागील आठ दिवसांत चांदीचे दर तब्बल २६ हजार रुपयांनी घसरले. बुधवारी एकाच दिवसात ११ हजारांची घसरण नोंदवली गेली.
नागपूरच्या बाजारात १५ ऑक्टोबर रोजी ३ टक्के जीएसटीसह चांदीचा भाव १.८९ लाख प्रति किलो इतका होता. मात्र २२ ऑक्टोबरपर्यंत तो १.६३ लाख प्रति किलोपर्यंत उतरला. म्हणजे अवघ्या आठ दिवसांत २६ हजार रुपयांची घसरण झाली. या घसरणीचा परिणाम म्हणून गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता आणि चिंता वाढताना दिसत आहे.
सोनेही घसरले, एकाच दिवसात ६,५९२ रु. खाली
२१ ऑक्टोबरच्या तुलनेत, २२ रोजी २४ कॅरेट सोन्याच्या दरातही मोठी घसरण झाली. २४ कॅरेट सोन्याचा दर १,३२,३५५ प्रति १० ग्रॅमवरून (३ टक्के जीएसटीसह) थेट १,२५,७६३ रुपयांपर्यंत खाली आला. केवळ २४ तासांतच ६,५९२ रुपयांची घसरण नोंदवली गेली.
घसरणीची मुख्य कारणे :
आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता
डॉलरच्या तुलनेत रुपयाची कमजोरी
सोने-चांदीच्या जागतिक मागणीत घट
गुंतवणूकदारांचा शेअर बाजाराकडे कल