बदलापूर घटनेच्या निषेधार्थ काँग्रेसचे मूक आंदोलन
By गणेश हुड | Updated: August 24, 2024 13:57 IST2024-08-24T13:51:21+5:302024-08-24T13:57:53+5:30
राज्यात नराधमाना पाठिशी घालणारे सरकार : विजय वडेट्टीवार यांचा हल्लाबोल

Silent movement of Congress to protest the Badlapur incident
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये दोन शाळकरी मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचारानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. घटनेच्या निषेधार्थ शनिवारी महाविकास आघाडीकडून राज्यभरात मूक आंदोलन करण्यात येत आहे. नागपुरात संविधान चौकात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व काँग्रेसचे शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते व नेत्यांनी तोंडावर काळीपट्टी बांधून निषेध आंदोलन केले. राज्यात नराधमांना पाठिशी घालणारे सरकार असल्याचा हल्लाबोल विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केला. व्हेरायटी चौक गांधी पुतळा येथे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार ) तर्फे निषेध आंदोलन करण्यात आले.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह विभाग आहे. गेल्या काही वर्षांत राज्यात महिला, मुलींवरील अत्याचाराच्या घटनात वाढ झाली आहे. मागील काही महिन्यांत ५७ टक्क्यांनी गुन्हेगारी वाढली आहे. राज्यातील महिला सुरक्षीत नाहीत. बदलापूर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. संतप्त नागरिक रस्त्यावर उतरल्यावर व न्यायालयाने फटकारल्यावर सरकारला जाग आली. बदलापूरच्या अत्याचाराच्या घटनेने राज्यातील महिला मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले. बदलापूरच्या घटनेत पोलीसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तक्रार दाखल करण्यास गेलेल्या पीडित मुलीच्या आईला तासनसात पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवण्यात आले. पोलीस यंत्रणेसोबतच राज्य सरकारच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण झाला असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले. यावेळी आमदार अभिजीत वंजारी, तानाजी वनवे, रेखा बाराहाते, अशोक धवड, प्रफुल्ल गुडधे, गिरीश पांडव, अतुल कोटेचा, विशाल मुत्तेमवार यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.