योगेश पांडे, नागपूरनागपूर : शिंदेसेनेचे मंत्री असलेल्या संजय राठोड यांच्या मृद व जलसंधारण विभागाच्या कारभारावर भाजप आमदार संदीप जोशी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अधिकाऱ्यांनी आर्थिक देवाणघेवाण करून आठ अधिकारी-कर्मचाऱ्यांची विभागात नियमबाह्य पद्धतीने नेमणूक केल्याचा आरोप जोशी यांना लावला आहे. मंत्र्यांच्या दालनात दोन्ही विभागातील सचिवांना बोलवून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रातून केली आहे. जोशी यांच्या या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
२०१७ पर्यंत राज्य शासनाकडे जलसंपदा असा एकच विभाग होता. त्यानंतर मृद व जलसंधारण तसेच जलसंपदा असे दोन विभाग झाले. अगोदरच्या जलसंपदा विभागातील कर्मचाऱ्यांना नवीन कुठल्या विभागात जायचे आहे याबाबत ४५ दिवसांत विकल्प सादर करण्याची मुदत देण्यात आली होती. कर्मचाऱ्यांनी तसे विकल्प शासनाकडे दिले होते.
एकदा विकल्प सादर केल्यावर परत ते बदलता येणार नाही असा नियम होता. त्यामुळे शासनाने यादी जाहीर केली होती व आक्षेप मागण्यात आले. त्यानंतर यादीनिश्चिती झाली. मात्र पाच वर्षांनंतर आठ संबंधित अधिकाऱ्यांचे नाव जलसंपदा विभागातून काढून मृद व जलसंधारण विभागात टाकण्यात आले. यावरच जोशी यांनी आक्षेप घेतला आहे.
या प्रकारामुळे पावणेचारशेच्या जवळपास लोकांच्या आस्थापनेत गडबड झाली. कुणी वरिष्ठ झालं तर कुणी ज्युनिअर झालं. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर एकप्रकारे अन्यायच झाला. या अन्यायाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, असे संदीप जोशी यांनी स्पष्ट केले.
आर्थिक देवाणघेवाण झालीच
या प्रकरणात प्रशासनातील झारीतील शुक्राचार्यांनी गडबड केली व आर्थिक देण्याघेण्यातून आठ जणांचा विभाग बदलण्यात आला. २०२१ नंतर यात निश्चितपणे अनियमितता झाली आहे. विकल्प सादर करण्यास उशीर झाल्याचे कारण देत त्यांना मृद व जलसंधारण विभागात घुसविण्यात आले आहे, असा आरोप जोशी यांनी लावला.