शुभ मंगलम बाहुला-बाहुलीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 12:35 AM2019-07-14T00:35:12+5:302019-07-14T00:40:55+5:30

न्यू सहकारनगर येथे जुन्या मनोरंजक खेळांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. येथील महिलावर्गाने लहान मुलांच्या संगतीने बाहुला-बाहुलीचे लग्न लावून भातुकलीचा खेळ साजरा केला. मोबाईलच्या स्क्रीनवर कायम बोटे असणाऱ्या नव्या पिढीतील मुलांना, जुन्या खेळांतून व्यवस्थापनाचे धडे कसे मिळत होते, याचे प्रत्यक्ष दर्शनही घडविले.

Shubh Mangalm Bahula-Bahuliche | शुभ मंगलम बाहुला-बाहुलीचे

शुभ मंगलम बाहुला-बाहुलीचे

googlenewsNext
ठळक मुद्देनागपूरच्या न्यू सहकारनगरात थाटात पार पडला सोहळा‘भातुकलीच्या खेळातून’ मुलांना घडविले जुन्या खेळाचे दर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : न्यू सहकारनगर येथे जुन्या मनोरंजक खेळांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. येथील महिलावर्गाने लहान मुलांच्या संगतीने बाहुला-बाहुलीचे लग्न लावून भातुकलीचा खेळ साजरा केला. मोबाईलच्या स्क्रीनवर कायम बोटे असणाऱ्या नव्या पिढीतील मुलांना, जुन्या खेळांतून व्यवस्थापनाचे धडे कसे मिळत होते, याचे प्रत्यक्ष दर्शनही घडविले. 

‘पब-जी’सारख्या जगताला भूलवून टाकणाऱ्या खेळांमुळे, मुलांचा नाहक बळी जात असल्याच्या घटना कुठे ना कुठे उघडकीस येत आहेत. मोबाईल गेम, व्हिडीओ गेमचा प्रचंड प्रभाव असणारी नवी पिढी अत्यंत तल्लख असली तरी, तंत्रज्ञानाच्या हव्यासापोटी कुठेतरी खुजी झाली आहे. आणि त्यामुळेच जुने मजेशीर आणि शरीर व बुद्धीला बळकटी देणारे खेळ विस्मृतीत जात असल्याचे दिसून येते. त्याच शृंखलेत ‘भातुकलीच्या खेळा’चा समावेश होतो. हा खेळ फार जुन्या काळापासून खेळला जात आहे. मात्र, नवी पिढी या अत्यंत मनोरंजक खेळापासून अलिप्त आहे. गेल्या पाच वर्षांपासून रमणा मारोती मंदिर परिसरात भातुकलीचा खेळ साजरा केला जात आहे. यंदाही हा खेळ उत्साहात पार पडला. अगदी सामान्य विवाह लावले जातात तसाच थाट या बाहुला-बाहुलीच्या लग्नाचा होता. वर-वधू अर्थात बाहुला-बाहुलीचे आई-वडील, मामा, पुजारी, वर-वधूचे मित्र-मैत्रिणी आणि वऱ्हाडी सोबतच बॅण्ड पथक़.. असा सगळा थाट या सोहळ्यात होता. एवढेच नव्हे तर लग्नापूर्वीच्या बोलणीमध्ये वर आणि वधू पक्षातील नातलगांमध्ये असलेली रस्सीखेचही उत्तम रंगली. त्यानंतर वधू व वराची एकसाथ वरात काढण्यात आली आणि नंतर विधिवत विवाह संस्कार पार पडले. भेटवस्तू देण्यासोबतच नाव घेण्याची प्रथा, जेवणाच्या पंगती आणि झालेल्या खर्चाची मोजदाद असा सर्व विवाहसोहळ्याचा थाट न्यू सहकारनगर येथे रंगला. या खेळात मुलांना मुद्दामहून सहभागी करवून घेत मुलांना खेळावाटे व्यवहारकौशल्य कसे साधले जाते, याचे धडेही दिले. या सोहळ्याच्या आयोजनासाठी रेखा पौनीकर, कल्पना वरंभे, छाया ठाकरे, लता देशमुख, रोहिणी हिवसे, योगिता तेलरांधे, सुरेखा वडीचार, नंदा बावणे, नमिता ढोरे, रोमा दीक्षित, दीपाली बावणे, संगीता ठाकरे, रुपाली पौनीकर, स्नेहा गोतमारे, चंदा गाणार, बिलगय्ये, सरस्वती थोटे, उमा दीक्षित, सीमा बावणे, मंजूषा ठाकरे, गायत्री ढोरे, दर्शना पौनीकर, ओनिता पौनीकर यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Shubh Mangalm Bahula-Bahuliche

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.