Income Tax: हातावर पोट भरणाऱ्या मजुराला आयकर विभागाकडून तब्बल ३१४ कोटींची नोटीस!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 13:25 IST2025-04-10T13:18:31+5:302025-04-10T13:25:02+5:30
भाड्याच्या घरात राहणारा आणि मुजरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या मजुराला आयकर विभागाकडून तब्बल ३१४ कोटी ७९ लाख ८७ हजार ८३ रुपयांची नोटीस मिळाली.

Income Tax: हातावर पोट भरणाऱ्या मजुराला आयकर विभागाकडून तब्बल ३१४ कोटींची नोटीस!
हातावर पोट भरणाऱ्या एका मजुराला आयकर विभागाकडून ३१४ कोटी रुपयांची नोटीस मिळाली. आर्थिक परिस्थिती बिकट असताना आयकर विभागाने कोट्यावधी रुपयांची नोटीस पाठवल्याने मजूर आजारी पडला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सखोल चौकशी करण्यात यावी, अशी विनंती मजुराने केली आहे.
चंद्रशेखर पंडित राव कोहाड असे मजुराचे नाव आहे. चंद्रशेखर हा मूळचा मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील रहिवाशी आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तो गेल्या काही दिवसांपासून नागपूर येथे मजुरी करत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी चंद्रशेखरला आयकर विभागाकडून तब्बल ३१४ कोटी ७९ लाख ८७ हजार ८३ रुपयांची नोटीस मिळाली. भाड्याच्या घरात राहणारा आणि मुजरी करणाऱ्या चंद्रशेखरला हे नोटीस पाहिल्यानंतर मोठा धक्का बसला.
नेमक प्रकरण काय?
महाराष्ट्रातील आयकर विभागाने बैतुल मुलताई नगरपालिकेकडून चंद्रशेखर याच्या मालमत्तेबाबत माहिती मागितली, तेव्हा हा मुद्दा उघडकीस आला. ही चौकशी त्याच्या नावावर नोंदणीकृत असलेल्या जमिनीवर आधारित होती. चौकशीदरम्यान, असे समजले की, ही जमीन चंद्रशेखर याच्या मालकीची नाही. तर, आमलाच्या देवठाण येथील रहिवाशी राधेलाल किराड याचा मुलगा मनोहर हरकचंद याच्या नावावर नोंदणीकृत आहे. चंद्रशेखर याच्या नावावर कोणत्याही जमिनीची नोंद नसल्याचे महापालिका अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. याबाबत आयकर विभागाला कळवण्यात आले आहे.
नोटीस मिळाल्यापासून संपूर्ण कुटूंब तणावात
चंद्रशेखरने सांगितले की त्याची पत्नी आजारी आहे आणि नोटीस मिळाल्यापासून संपूर्ण कुटुंबावर मानसिक ताणावात आहे. चंद्रशेखर स्वतः हृदयरोगी आहेत. आयकर विभागाच्या अनपेक्षित नोटीसमुळे तो आजारी पडला आहे. सध्या त्याच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे.
सखोल चौकशीची मागणी
चंद्रशेखरने सांगितले की, त्याने चार वर्षांपूर्वी नागपुरात एक बँक खाते उघडले होते, तिथे तो रोजच्या कमाईतून काही बचत जमा करत होता. बँकेतील एजंटने त्याच्याकडून मोबाईल नंबर घेतला होता. परंतु, तो नंबर कधीही त्यांच्या खात्याशी जोडला गेला नाही, असेही तो म्हणाला. या व्यवहारांशी कोणताही संबंध नसताना इतका मोठा कर कसा लादला गेला, याबाबत जाणून घेण्यासाठी चंद्रशेखरने संबंधित अधिकाऱ्यांकडे सखोल चौकशीची विनंती केली आहे. नकळत त्याच्या नावाने गैरवापर केल्याचा त्यांना संशय आहे.