नागपुरात हुंडाबळीची धक्कादायक घटना; सासरच्या जाचाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 17:56 IST2026-04-11T17:47:43+5:302026-04-11T17:56:58+5:30
Nagpur : लग्नानंतर सुखाचा संसार करण्याचे स्वप्न घेऊन सासरी आलेल्या एका २६ वर्षीय नवविवाहितेने छळाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलले आहे.

Shocking incident of dowry sacrifice in Nagpur; Newlywed commits suicide due to harassment by in-laws
नागपूर : लग्नानंतर सुखाचा संसार करण्याचे स्वप्न घेऊन सासरी आलेल्या एका २६ वर्षीय नवविवाहितेने छळाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलले आहे. हुंड्यासाठी पैशांची मागणी आणि सासरच्या मंडळींच्या सततच्या त्रासामुळे सना अंजुम अकील खान (२६) हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
सुरुवातीला सर्व सुरळीत, पण नंतर...
मिळालेल्या माहितीनुसार, गंजीपेठ येथील रहिवासी सना हिचा विवाह २०२४ मध्ये शोएब ऊर्फ सैफ अयूब खान (३०) याच्याशी झाला होता. लग्नानंतर काही काळ सर्व काही सुरळीत सुरू होते. मात्र, काही महिन्यांतच सासरच्या मंडळींच्या वागण्यात बदल झाला. पती शोएब, सासरे, सासू आणि नणंद यांनी सनाकडे माहेरून पैसे आणण्यासाठी तगादा लावला.
मानसिक आणि शारीरिक छळ
हुंड्याच्या मागणीवरून सनाला वारंवार मानसिक आणि शारीरिक छळाला सामोरे जावे लागत होते. घरातील सततचे टोमणे आणि अत्याचारामुळे ती मानसिकदृष्ट्या खचली होती. संसार टिकवण्यासाठी तिने अनेकदा हा त्रास सहन केला, मात्र सासरच्या मंडळींच्या मागणीत आणि वागणुकीत कोणताही बदल झाला नाही. अखेर सततच्या तणावाला कंटाळून सना हिने ७ एप्रिल रोजी सायंकाळी राहत्या घरी गळफास लावून आपले जीवन संपवले.
पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
या घटनेने परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. सनाच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून गणेशपेठ पोलिसांनी पती शोएब, सासरे, सासू आणि नणंद अशा चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच हुंडाबळी प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पोलीस उपनिरीक्षक नीलम घोडके या प्रकरणाचा पुढील तपास करत असून आरोपींची चौकशी सुरू आहे.