धक्कादायक ! शेती नाही तरी एक लाख नागरिकांवर आहे १२५ कोटींचा 'सावकारी कर्जाचा फास'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 17:29 IST2025-12-19T17:22:59+5:302025-12-19T17:29:35+5:30
Nagpur : 'गाव तिथे बँक' ही संकल्पना, सहकारी पतसंस्था, पोस्ट ऑफिस, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अशा विविध आर्थिक सुविधा गावागावांत पोहोचल्या असतानाही नागपूर जिल्ह्यातील तब्बल १ लाख १८३ नागरिकांनी सावकारांकडून १२५.३६ कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

Shocking! Even though there is no agriculture, one lakh citizens are stuck with a 'loan of Rs 125 crore'
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : 'गाव तिथे बँक' ही संकल्पना, सहकारी पतसंस्था, पोस्ट ऑफिस, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अशा विविध आर्थिक सुविधा गावागावांत पोहोचल्या असतानाही नागपूर जिल्ह्यातील तब्बल १ लाख १८३ नागरिकांनी सावकारांकडून १२५.३६ कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हे संपूर्ण कर्ज बिगर कृषी कारणांसाठी घेतले गेले असून, शेतीसाठी एकही रुपयाचे कर्ज सावकाराने वाटलेले नाही.
जिल्ह्यात सध्या १२३६ परवानाधारक सावकार आहे. परवानाधारक सावकारांना शेतीसाठी तारण किंवा विनातारण कर्ज तसेच बिगर परवानाधारक सावकारांचे कर्जाचे शेती कर्ज देताना शासनाने निश्चित केलेले व्याजदर लागू आहेत. शेतीसाठीचे व्याजदर तुलनेने कमी असल्यामुळे जिल्ह्यात सावकारांकडून शेतीसाठी कर्ज घेण्याचे प्रमाण शून्यावर आहे.
मात्र, घरगुती गरजा, शिक्षण, आजारपण, विवाह किंवा व्यवसायासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात सावकारांकडे वळत असल्याचे वास्तव समोर आले आहे. दरम्यान, सावकारीच्या विळख्याची गंभीरता अधोरेखित करणारी घटना शेजारच्या चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिथूर गावात घडली. सावकाराकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी एका शेतकऱ्याने किडनी विकली. यामुळे परवानाधारक व अवैध सावकारांसह प्रशासकीय यंत्रणेवरही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. उपनिबंधक कार्यालयाकडे परवानाधारक सावकारांची नोंद असली तरी अवैध सावकारांची संख्या लक्षणीय असल्याचे वास्तव नाकारता येत नाही.
सावकारांविरोधात वर्षभरात तीन तक्रारी
जिल्ह्यात २०२५ मध्ये सावकारांविरोधात आतापर्यंत केवळ तीन तक्रारी उपनिबंधक कार्यालयाला प्राप्त झालेल्या आहेत. त्यातील एक तक्रार अवैध सावकाराची आहे. त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.
परवानाधारक सावकारांचे कर्जाचे व्याजदर ?
- शेतीच्या कामासाठी घेतलेले तारण कर्ज - ६ टक्के
- शेतीच्या कामासाठी घेतलेले विनातारण कर्ज - ९ टक्के
- बिगर शेतीच्या कामासाठी घेतलेले तारण कर्ज - १२ टक्के
- बिगर शेतीच्या कामासाठी घेतलेले विनातारण कर्ज -१५ टक्के
"सावकारी कायदा झाल्यापासून सावकारांकडून शेतक-यांच्या होणाऱ्या पिळवणुकीच्या बऱ्यापैकी अंकुश आला आहे; पण परवानाधारक असो की अवैध सावकाराने शेतकऱ्यांची पिळवणूक केली. अतिरिक्त व्याज वसूल केले, कर्जाची परतफेड केल्यानंतर तारण ठेवलेली वस्तू परत करीत नसेल, तर जिल्हा उपनिबंधक कार्यालय, तालुका कार्यालय अथवा पोलिसांकडून तक्रारी केल्यास योग्य सावकारांवर कारवाई केली जाते."
- अजय कडू, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था