धक्कादायक, नागपुरात अपघातामुळे रोज २ मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2022 07:00 IST2022-02-26T07:00:00+5:302022-02-26T07:00:08+5:30
Nagpur News मागील ५५ दिवसांत नागपूर जिल्ह्यात तब्बल १६२ अपघात झाले असून यात ११३ व्यक्तींचे जीव गेले आहेत. यावरून रोज जवळपास ३ अपघात होत असून २ जणांचा मृत्यू होत आहे.

धक्कादायक, नागपुरात अपघातामुळे रोज २ मृत्यू
सुमेध वाघमारे
नागपूर : कोरोनाचे निर्बंध शिथिल होताच रस्त्यावर पुन्हा एकदा गर्दी होऊ लागली आहे. परिणामी अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मागील ५५ दिवसांत नागपूर जिल्ह्यात तब्बल १६२ अपघात झाले असून यात ११३ व्यक्तींचे जीव गेले आहेत. यावरून रोज जवळपास ३ अपघात होत असून २ जणांचा मृत्यू होत आहे.
भारतात दररोज सरासरी २५० माणसे वाहन अपघातात मृत्युमुखी पडतात. रोज ७०० व्यक्ती जखमी होतात किंवा त्यांना कायमचे अपंग येते. विशेष म्हणजे, अपघातांमध्ये २० ते ४० या वयोगटातील तरुणांची संख्या मोठी आहे. परिणामी, थेट कुटुंबावरच प्रभाव पडत आहे. एकूण अपघातांपैकी ७० ते ८० टक्के अपघात केवळ मानवी चुकांमुळे होत असल्याने ते निश्चितच टाळता येतात. यामुळे वाहतूक नियमांच्या जनजागृतीचे व रस्ता वापरणाऱ्या घटकांकडून वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन होणे गरजेचे आहे, परंतु प्रत्यक्ष तसे होताना दिसून येत नसल्याचे वास्तव आहे.
३१ दिवसांत शहरात ३२ मृत्यू
जानेवारी महिन्यात शहरात ९२ अपघात झाले. यात ३२ व्यक्तींचे जीव गेले. ४२ व्यक्ती गंभीर जखमी झाल्या असून १८ व्यक्ती किरकोळ जखमी झाल्या. एकूण शहरात रोज जवळपास ३ अपघात होत असून यात एका व्यक्तीचा मृत्यू होत आहे.
५५ दिवसांत ग्रामीणमध्ये अपघातात ८१ मृत्यू
जानेवारी महिन्यात नागपूर ग्रामीणमध्ये ४१ अपघात झाले. यात ४९ व्यक्तींचे जीव गेले. तर १ ते २४ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या २९ अपघातात ३२ मृत्यू झाले. एकूणच मागील ५५ दिवसांत झालेल्या ७० अपघातात ८१ मृत्यू झाले. यावरून ग्रामीणमध्ये रोज एकापेक्षा जास्त अपघात होत असून तेवढ्याच व्यक्तींचे जीव जात आहेत.
रस्ता सुरक्षा अभियान नावालाच!
रस्ता सुरक्षा आणि त्याचे महत्त्व वाढावे व रस्ते अपघातांची संख्या कमी व्हावी या उद्देशाने दरवर्षी जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात रस्ता सुरक्षा अभियान राबविले जाते, परंतु कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून हे अभियान नावालाच आहे. नागपूर जिल्ह्यात वाढत्या अपघातात जात असलेले बळी पाहता कुठे आहे रस्ता सुरक्षा अभियान, अशी म्हणण्याची वेळ आली आहे.