शिवसेना भवनात शिवसैनिकांची वर्दळ

By Admin | Updated: September 29, 2016 02:25 IST2016-09-29T02:25:30+5:302016-09-29T02:25:30+5:30

शिवसैनिकांच्या हक्काचे स्थान म्हणजे शिवसेना भवन. प्रत्येक शिवसैनिकाला पक्षाचे हे कार्यालय आपलेसे वाटते.

Shiv Sena workers' rally in Shivsena Bhavan | शिवसेना भवनात शिवसैनिकांची वर्दळ

शिवसेना भवनात शिवसैनिकांची वर्दळ

शाखा प्रमुखांच्या बैठका सुरू : विधानसभानिहाय नियोजनात व्यस्त
नागपूर : शिवसैनिकांच्या हक्काचे स्थान म्हणजे शिवसेना भवन. प्रत्येक शिवसैनिकाला पक्षाचे हे कार्यालय आपलेसे वाटते. निष्ठावान शिवसैनिकांची येथे नित्यनेमाने ये-जा सुरू असते. आता महापालिकेच्या निवडणुका तोंडावर असल्यामुळे वर्दळ वाढली आहे. शहर, विधानसभा व शाखा स्तरावरील बैठका घेण्यापासून ते पक्षाच्या विशेष बैठकांपर्यंतचे आयोजन या कार्यालयात होते. एवढेच नव्हे तर पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांसाठी हे कार्यालय तक्रार निवारण केंद्रही झाले आहे. येथे कार्यकर्ते आपल्या भागातील नागरिकांच्या समस्या घेऊन येतात. शिवसेनेचे पदाधिकारी त्या ऐकूण घेत सोडविण्यासाठी प्रयत्न करतात.

असे आहे शिवसेना भवन
रेशीमबाग चौकात राघव अपार्टमेंटमध्ये पहिल्या माळ्यावर सुमारे दीड हजार चौरस फुटाच्या फ्लॅटमध्ये शिवसेनेचे शहर व जिल्हा कार्यालय आहे. हे कार्यालय पक्षाच्या मालकीचे आहे. या इमारतीवर दुरूनच भगवा फडकलेला दिसतो. कार्यालयात जिल्हाध्यक्ष सतीश हरडे यांचा स्वतंत्र कक्ष आहे. याशिवाय एक संगणक कक्ष व पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यासाठी एक मोठा बैठक कक्ष आहे. कार्यालय वीज, पाणीपुरवठा, संगणक, इंटरनेट आदी सर्व सुविधा उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधादेखील उपलब्ध आहे. या कार्यालयाच्या संचालनासाठी लागणारा खर्च हा स्थानिक पातळीवर केला जातो.
शिवसैनिकांची नोंदणी सुरू
शिवसेनेतर्फे सध्या शिवसैनिकांची नोंदणी करण्यासाठी अर्ज भरून घेतले जात आहेत. मुंबईहून सुमारे ३५ हजार अर्ज आणण्यात आले आहेत. शहर कार्यालयातून अर्जांचे वितरण शाखा प्रमुखांना केले जात आहे. शाखा प्रमुखांनी भरून आणलेले अर्ज येथे स्वीकारले जात आहेत. त्यामुळे कार्यालयात शाखा प्रमुखांची गर्दी पहायला मिळते.
बैठकांचे नियोजन
एकदा शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होते. याशिवाय दर आठवड्याला विधानसभानिहाय (विभाग) बैठका होतात. या बैठकींमध्ये पक्षातर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची रूपरेषा ठरते. या बैठकांचे अहवाल तयार करून त्याची शहर कार्यालयात स्वतंत्र नोंद ठेवली जाते.

असे चालते दैनंदिन कामकाज
शिवसेना भवनात दोन कर्मचारी काम करतात. सकाळी ११ ते दुपारी ३ व सायंकाळी ५ ते ९ अशा वेळेत कार्यालय उघडे असते. जिल्हाध्यक्ष सतीश हरडे दररोज दुपारी १२ वाजता येतात. पूर्व नागपूरचे विभाग प्रमुख नरेंद्र मगरे हे शहरातील इतर पदाधिकाऱ्यांना बैठकांचे निरोप देणे, आंदोलनांची माहती कळविणे आदी जबाबदारी पार पाडतात. कार्यालयीन सचिव मिलिंद रामटेके हे सकाळी १०.३० वाजता येतात. कार्यालयात प्रश्न घेऊन येणाऱ्या नागरिकांचे म्हणणे ऐकून घेणे, त्यांच्या प्रश्नांबाबत जिल्हाध्यक्षांना अवगत करणे व स्थानिक पदाधिकाऱ्यांना कळविणे आदी जबाबदारी ते पार पाडतात. दक्षिण विधानसभा संघटक राजू कनोजिया यांच्यावर पूर्णवेळ संपर्काची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याशिवाय पदाधिकाऱ्यांना कार्यालयातील उपस्थितीचे दिवस निश्चित करून देण्यात आले आहेत.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे यूपीएससीचे धडे
युवकांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करण्यासाठी नागपुरातील शिवसेना भवनात एक अभिनव उपक्रम राबविला जातो. येथे यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे धडे दिले जातात. बाळासाहेब ठाकरे आयएएस अकादमी, मुंबई येथे यूपीएससीचे नि:शुल्क वर्ग घेतले जातात. या वर्गाला नागपुरात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जोडले जाते. या वर्गात प्रवेश देण्यासाठी गेल्यावर्षी शिवसेनेतर्फे परीक्षा घेण्यात आली होती. मुंबईहून प्रश्नपत्रिका मागविल्या. ४०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १६ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. शेवटी पाच विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. दररोज सकाळी ११ ते दुपारी १ पर्यंत कॉन्फरन्सिंगद्वारे या विद्यार्थ्यांना यूपीएससीचे धडे दिले जायचे. तीन महिन्यांपूर्वीच ही बॅच संपली. आता लवकरच नवीन बॅच सुरू केली जाणार आहे.
दिवाळीनंतर उमेदवारी अर्ज वितरण
महापालिकेच्या निवडणुकीसाठी दिवाळीनंतर शिवसेना भवनातून उमेदवारी अर्ज वितरित केले जातील. भरलेले अर्ज येथेच स्वीकारले जातील. त्यानंतर येथेच इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती होतील व एबी फॉर्मही येथूनच वितिरित केला जाईल. सध्या शाखा स्तरावर मतदार नोंदणीचे काम सुरू असून झालेल्या नोंदणीचा अहवाल शहर कार्यालयाला पाठविणे सुरू आहे.

Web Title: Shiv Sena workers' rally in Shivsena Bhavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.