शेख समीरला खापरखेड्यात अटक
By Admin | Updated: December 23, 2014 00:34 IST2014-12-23T00:34:23+5:302014-12-23T00:34:23+5:30
चंद्रपूर पोलिसांना मोस्ट वॉन्टेड असलेला घुग्गुस येथील कोलमाफिया शेख समीर ऊर्फ राजू याला आज सायंकाळी खापरखेडा पोलिसांनी अटक केली. त्याला घुग्गुस (चंद्रपूर) पोलिसांच्या हवाली केले जाणार आहे.

शेख समीरला खापरखेड्यात अटक
मोस्ट वॉन्टेड : चंद्रपूर पोलिसांच्या हवाली करणार
नागपूर : चंद्रपूर पोलिसांना मोस्ट वॉन्टेड असलेला घुग्गुस येथील कोलमाफिया शेख समीर ऊर्फ राजू याला आज सायंकाळी खापरखेडा पोलिसांनी अटक केली. त्याला घुग्गुस (चंद्रपूर) पोलिसांच्या हवाली केले जाणार आहे.
शेख समीरने २ नोव्हेंबरला शगीर आणि त्याच्या भावाला चारवेळा फोन केले आणि एक महिन्यात जीवे मारेन, अशी धमकी दिली होती. हे फोन कॉल रेकॉर्ड करून शगीरने घुग्गुस पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.
तेव्हापासून घुग्गुस आणि चंद्रपूर पोलीस समीरचा शोध घेत होते. तो फरार असताना इकडे शगीरची नागपुरात हत्या झाली. त्यामुळे समीर या हत्याकांडाशी जुळला असल्याची चर्चा सर्वत्र होती. म्हणूनच समीरचा शोध घेण्यासाठी सीताबर्डी पोलिसांचे पथक घुग्गुस आणि चंद्रपूर येथे गेले होते.
मात्र कुणाचे दडपण आले कळायला मार्ग नाही. पोलिसांनी या हत्याकांडात समीरचे नाव कागदोपत्री कुठेही लिहिले नाही. आज सायंकाळी शगीरचा भाऊ आणि काकाने नागपुरात पत्रकार परिषद घेतली आणि या हत्याकांडात समीरचा हात असल्याचा आरोप केला.
तर तिकडे नागपूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांना कुख्यात समीर खापरखेड्यात माऊझर घेण्यासाठी आल्याची माहिती मिळाली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले. डीवायएसपी चव्हाण यांनी शोधाशोध करून कुख्यात समीरला ताब्यात घेतले. (प्रतिनिधी)