Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु

By निशांत वानखेडे | Updated: September 16, 2025 19:47 IST2025-09-16T19:46:21+5:302025-09-16T19:47:47+5:30

पहिल्या दिवशी ५० शिक्षकांची सुनावणी : अधिकारी म्हणाले, कारवाई हाेणार

Shalarth ID Scam : Will 'those' 632 teachers, principals go to jail? The biggest scam in the education sector is being investigated | Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु

Shalarth ID Scam : Will 'those' 632 teachers, principals go to jail? The biggest scam in the education sector is being investigated

नागपूर :शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा भ्रष्टाचार म्हणून राज्यभर गाजणाऱ्या बाेगस शालार्थ आयडी घाेटाळ्यात अडकलेल्या संशयित ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक, शाळा संचालकांची झाडाझडती मंगळवारपासून अखेर सुरू करण्यात आली. पहिल्या दिवशी ५० शिक्षकांना सुनावणीस बाेलावून त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. हे नियुक्तीबाबतच्या कागदपत्रांची पुर्तता न करू शकणाऱ्या शिक्षकांवर काय कारवाई हाेईल, हा चर्चेचा विषय आहे.

शिक्षण आयुक्तांनी शाळा आयडी घोटाळा प्रकरणात संशयित शिक्षकांची सुनावणी वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत करण्याचे आदेश दिले आहेत. ही सुनावणी उपसंचालक पातळीवर होत असून, उपसंचालकांनी यासाठी एक समिती गठित केली आहे. या समितीत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) येथील अधिकारी समाविष्ट आहेत. डाएटच्या कार्यालयातच ही सुनावणी सुरू आहे.

शालार्थ घोटाळ्यामध्ये जिल्ह्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षकांची नियुक्ती झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. शालार्थ आयडीच्या माध्यमातून त्यांना वेतनसुद्धा सुरू करण्यात आले होते. या प्रकरणात सायबर पोलिसांकडे गुन्हा दाखल असून आतापर्यंत २० अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापकांना अटक करण्यात आली आहे. शिक्षण आयुक्तांच्या आदेशानुसार संशयित शिक्षकांची सुनावणी आता उपसंचालक पातळीवर हाेत आहे. शिक्षण उपसंचालक माधुरी सावरकर यांनी प्रथम संबंधित शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य व शाळा व्यवस्थापकांना नोटीस बजावली हाेती. त्यानुसार मंगळवार १६ सप्टेंबरपासून प्रत्यक्ष सुनावणी सुरू झाली. बनावट शिक्षक नियुक्ती प्रकरणात उपसंचालक कार्यालय स्वतः तक्रारदार आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार या शिक्षकांचे शालार्थ आयडी उपसंचालक कार्यालयातून बनविल्याच गेलेले नाहीत. अनेक शिक्षकांची नियुक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे झाली आहे. अशा शिक्षकांना अयोग्य ठरविले जाऊ शकते, असा अंदाज आहे.

शिक्षकांची संख्या अधिक असल्याने पहिल्या दिवशी ५० शिक्षकांना सुनावणीसाठी बाेलावण्यात आले. त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. यात मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापकांचाही समावेश आहे. या प्रकरणात ६३२ शिक्षक संशयित असल्याने त्यांच्या सुनावणीस १२ ते १५ दिवस लागण्याची शक्यता आहे. सुत्राच्या माहितीनुसार बरेच शिक्षक शालार्थ आयडीबाबतचे पुरावे सादर करू शकलेले नाहीत. अधिकाऱ्यांच्या मते पुरावे सादर न करू शकणाऱ्या शिक्षकांना अयाेग्य ठरवून त्यांची नियुक्तीही रद्द केली जाऊ शकते. त्यामुळे शिक्षकांची धाकधुक वाढली आहे.

"या प्रकरणाची गंभीरता पाहता संशयित शिक्षक, मुख्याध्यापक व शाळा संचालकांची सुनावणी सुरू आहे. मंगळवारी ५० लाेकांना सुनावणीस बाेलाविण्यात आली. संख्या माेठी असल्याने टप्प्याटप्प्याने पंधरापेक्षा अधिक दिवस ही सुनावणी चालेल. ती पूर्ण झाल्याशिवाय या प्रकरणात काही सांगता येणार नाही. कारवाईबाबत वरिष्ठ स्तरावर निर्णय हाेईल."
- माधुरी सावरकर, शिक्षण उपसंचालक, नागपूर

Web Title: Shalarth ID Scam : Will 'those' 632 teachers, principals go to jail? The biggest scam in the education sector is being investigated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.