लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहर पोलिसांच्या विशेष पथकाने वाडी परिसरातील एका ‘स्पा अॅण्ड सलून‘मध्ये धाड टाकून देहव्यापारासाठी आणलेल्या दोन तरुणींची सुटका केली. शिवाय, या तरुणींना देहव्यापार करण्यासाठी परावृत्त करणाऱ्या ३३ वर्षीय महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली.वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘अॅना डे लाईफस्टाईल स्पा अॅण्ड सलून लिमिटेड, वर्ल्ड स्पा सर्व्हिस (प्लॉट नंबर ५१, काचीमेट, अमरावती रोड) येथे एक महिला तरुणींना देहव्यापारासाठी परावृत्त करीत असून, ती ग्राहकांना तरुणी पुरवित असल्याची गुप्त माहिती अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) नीलेश भरणे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे नागपूर शहर पोलिसांच्या विशेष पथकाने शुक्रवारी त्या वर्ल्ड स्पा सर्व्हिसमध्ये बनावट ग्राहक पाठवून चाचपणी केली.पोलिसांना मिळालेली माहिती खरी असल्याचे त्या ग्राहकाने सांगताच शेजारी दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाने तिथे धाड टाकली. त्यावेळी त्यांना आत दोन तरुणी आढळून आल्या. सदर महिला तरुणींना पैशाचे आमिष दाखवून देहव्यापारासाठी परावृत्त करीत असल्याचे तसेच तरुणी ग्राहकांना पुरवित असल्याचे चौकशीदरम्यान स्पष्ट झाले.शिवाय, हा कुंटणखाना सार्वजनिक ठिकाणापासून २०० मीटरच्या आत असल्याचेही पोलिसांच्या निदर्शनास आले.त्यामुळे पोलिसांनी ‘त्या’ दोन्ही तरुणींची सुटका केली आणि आरोपी महिलेविरुद्ध अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम १९५६ चे कलम ३, ४, ५ व ७ अन्वये गुन्हा नोंदविला. या घटनेचा पुढील तपास वाडी पोलीस करीत आहे. ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) नीलेश भरणे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर, उपनिरीक्षक स्मिता सोनवणे, प्रीती कुळमेथे, सहायक फौजदार अजय जाधव, दामोदर राजूरकर, विजय गायकवाड, शीतलाप्रसाद मिश्रा, मुकुंद गारमोडे, प्रल्हाद डोळे, सुरेखा सांडेकर, छाया राऊत, साधना चव्हाण, सामाजिक कार्यकर्त्या सविता रेलकर, प्रीती सावरकर यांच्या पथकाने केली.
‘स्पा सर्व्हिस’च्या नावाखाली नागपुरात देहव्यापार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 11:00 IST
शहर पोलिसांच्या विशेष पथकाने वाडी परिसरातील एका ‘स्पा अॅण्ड सलून‘मध्ये धाड टाकून देहव्यापारासाठी आणलेल्या दोन तरुणींची सुटका केली.
‘स्पा सर्व्हिस’च्या नावाखाली नागपुरात देहव्यापार
ठळक मुद्देमहिलेविरुद्ध गुन्हा दाखल दोन तरुणींची सुटका