नागपूरच्या शासकीय सुधारगृहातील सात मुले पळाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 00:46 IST2019-01-21T00:45:08+5:302019-01-21T00:46:14+5:30
जरीपटक्यातील शासकीय बालसुधार(निरीक्षण)गृहात राहणारी आणि कामठी मार्गावरील शाळेत शिकणारी सात मुले शाळेतून एकसाथ पळून गेली. या घटनेमुळे शाळा आणि निरीक्षणगृह प्रशासनाचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. दरम्यान, ही खळबळजनक घटना शनिवारी सकाळी घडली. मात्र, निरीक्षणगृह प्रशासनाकडून त्याची तब्बल २४ तासानंतर जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली.

नागपूरच्या शासकीय सुधारगृहातील सात मुले पळाली
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जरीपटक्यातील शासकीय बालसुधार(निरीक्षण)गृहात राहणारी आणि कामठी मार्गावरील शाळेत शिकणारी सात मुले शाळेतून एकसाथ पळून गेली. या घटनेमुळे शाळा आणि निरीक्षणगृह प्रशासनाचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा उघडकीस आला आहे. दरम्यान, ही खळबळजनक घटना शनिवारी सकाळी घडली. मात्र, निरीक्षणगृह प्रशासनाकडून त्याची तब्बल २४ तासानंतर जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली.
जरीपटक्यातील पाटणकर चौकात शासकीय मुलांचे निरीक्षणगृह आहे. गुन्ह्यात सहभागी असलेल्या बालगुन्हेगारांना तसेच घरून निघून आलेल्या आणि कोणताही आधार नसलेल्या, रस्त्यावर भटकणाऱ्या मुलांना येथे ठेवले जाते. त्यांच्या जेवण, निवास आणि शिक्षणाचा खर्च शासनाच्या निधीतून केला जातो. अशाचपैकी येथे असलेल्या शाळकरी मुलांपैकी बेनामी संजुपाल यादव, कार्तिक दिलीप भास्कर (१७), शहिद बलबीर नाडे (वय १७), प्रशांत प्रल्हाद नेवारे (वय १७), राजाराम भालचंद्र उईके (वय १६), मोहम्मद नियाज हुसेन चिस्ती (वय १५) आणि परमेश्वर बाबूराव ढगे (वय १४) ही मुले शनिवारी सकाळी निरीक्षणगृहातून शाळेत जायला निघाले. ती सर्व कामठी मार्गावरील शेंडेनगरात असलेल्या समता विद्यालयात शिकतात. शाळेत पोहोचल्यानंतर ९ ते ९.३० या वेळेत शिक्षकांची नजर चुकवून ती मुले शाळेतून पळून गेली. ही बाब लक्षात आल्याने शाळा प्रशासनाची तारांबळ उडाली. इकडे-तिकडे विचारणा केल्यानंतर शाळेतील शिक्षकांनी निरीक्षणगृह प्रशासनाला त्याची माहिती कळविली. बराच वेळ विचारविमर्श केल्यानंतर निरीक्षणगृह प्रशासनाने जरीपटका पोलिसांना फोनवरून माहिती दिली. पोलिसांनी शाळा गाठून चौकशी केली. त्यानंतर या मुलांना शोधण्यासाठी शनिवारी दिवसभर आणि रविवारी सायंकाळपर्यंत प्रयत्न केले. मात्र, वृत्त लिहिस्तोवर मुले हाती लागली नाही.
अक्षम्य हलगर्जीपणा
जरीपटक्यातील या निरीक्षणगृहाचे प्रशासन नेहमीच हलगर्जीपणासाठी चर्चेला येते. येथून यापूर्वीही अनेक मुले पळाली आहेत. वर्षभरात अशाप्रकारच्या अनेक घटना घडूनही ठोस उपाययोजना का केल्या जात नाही, हा स्वतंत्र तपासाचा विषय ठरला आहे. दरम्यान, या घटनेची लेखी तक्रार नम्रता राजू चौधरी (वय ५२) यांनी निरीक्षणगृह प्रशासनातर्फे तब्बल २४ तासानंतर जरीपटका ठाण्यात नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक जे. एस. मिश्रा यांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, पळून गेलेल्या मुलांचा शोध घेतला जात आहे.