गंभीर आरोप, शाब्दिक चकमक; निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण नागपुरात आले समोरा-समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 13:40 IST2025-12-08T13:38:49+5:302025-12-08T13:40:33+5:30
Nilesh Rane Ravindra Chavan: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत कोकणात भाजप आणि शिवसेनेच्या दोन नेत्यांमध्ये जोरादार राजकीय संघर्ष बघायला मिळाला.

गंभीर आरोप, शाब्दिक चकमक; निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण नागपुरात आले समोरा-समोर
मालवण नगर परिषद निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावरच हल्ला चढवला. त्यांनी थेट पैसे वाटल्याचा आरोप केला. कोकणात सुरू झालेल्या या संघर्षाने भाजप आणि शिवसेनेतील संबंधाबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. दरम्यान, नागपूर अधिवेशनात आमदार निलेश राणे आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण समोरा-समोर आले.
मालवण नगर परिषद निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार निलेश राणे आक्रमक भूमिकेत दिसले. भाजप-शिवसेनेची युती न झाल्याने दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर हल्ला करताना दिसले. यात आमदार निलेश राणे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर घेरले होते.
रवींद्र चव्हाणांच्या भेटीनंतर निलेश राणे काय म्हणाले?
नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले. अधिवेशनासाठी आमदार निलेश राणे आणि आमदार रवींद्र चव्हाण नागपुरमध्ये आहेत. विधानभवन परिसरात दोन्ही नेते समोरा-समोर आले. यावेळी सगळ्यांचे लक्ष दोघांकडे वेधले गेले.
दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन केले. गळाभेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. भेटीनंतर निलेश राणे म्हणाले, "माझे आणि रवींद्र चव्हाण यांच्यासोबत काहीही वितुष्ट नाही. जे काही होतं ते निवडणुकीपुरते होते. माझा लढा व्यक्तीविरोधात नाही, तो व्यवस्थेविरोधात आहे. रवींद्र चव्हाण हे माझ्या मोठ्या भावासारखे आहेत", असे निलेश राणे म्हणाले.
निलेश राणेंनी पकडली होती २५ लाखांची रोकड
निलेश राणे यांनी भाजप पदाधिकाऱ्याच्या घरी धाड टाकत २५ लाखांची रोकड पकडली होती. २५ नोव्हेंबर रोजी मालवणमधील भाजपचे विजय किनवडेकर यांच्या घरी धाड टाकत बेहिशोबी रोख रक्कम पकडली होती. यानंतर रवींद्र चव्हाण यांच्यावर निलेश राणेंनी पैसे वाटल्याचा आरोप केला होता.
"मालवणमध्ये येऊन गेले, कालपासूनच वेगाने पैसे वाटपाची पद्धत सुरु झाली आहे. पैसे वाटून निवडणूक लढवायची आहे का? मैदानात येऊन लढा. रवींद्र चव्हाण जेव्हा जेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतात, तेव्हा वेगळे वातावरण निर्माण होते. ते काल जिल्ह्यात आले, मला संशय आला की हे असे सहज आलेले नाहीत", असा गंभीर आरोप निलेश राणेंनी केला होता.