आदिवासी विकास मंत्र्यांवर गंभीर आरोप ! सुतगिरणीसाठी शेतकऱ्याची २५ एकर जमीन हडपली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2025 18:17 IST2025-12-18T18:16:04+5:302025-12-18T18:17:19+5:30
Nagpur : आदिवासी विकास मंत्री अशोक वुईके यवतमाळच्या राळेगाव यांनी तालुक्यातील देवधरी या गावातील शेतकरी भुरबा कोवे यांची २५ एकर जमीन सुतगिरणीसाठी हडपली, असा आरोप अॅड. सीमा तेलंग यांनी पत्रकार परिषदेत केला.

Serious allegations against Tribal Development Minister! 25 acres of farmer's land grabbed for cotton mill?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आदिवासी विकास मंत्री अशोक वुईके यवतमाळच्या राळेगाव यांनी तालुक्यातील देवधरी या गावातील शेतकरी भुरबा कोवे यांची २५ एकर जमीन सुतगिरणीसाठी हडपली, असा आरोप अॅड. सीमा तेलंग यांनी पत्रकार परिषदेत केला.
अॅड. तेलंग म्हणाल्या, यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील देवधरी या गावात मधुसूदन देशमुख यांची २५ एकर जमीन होती. ही जमीन वहिवाटीने भुरबा कोवे या आदिवासी शेतकऱ्याला मिळाली. १९५०पासून ही जमीन कोवे यांच्या ताब्यात होती. सातबारावर कोवे यांचे नाव होते. परंतु आदिवासी मंत्री वुईके यांनी २०२०मध्ये कोवे यांच्या शेतात जेसीबी टाकून पीक उद्ध्वस्त करून कोवे यांचा मुलगा, मुलगी व जावई यांना मारहाण केली. मूळ जमीन असलेल्या देशमुख यांच्या वारसांकडून ती खरेदी केली व तलाठ्याशी संगनमत करून डिजिटल सातबारावरून कोवे यांचे नाव हटविले. कोवे यांचे वारस तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिसांनी त्यांची तक्रार स्वीकारली नसल्याचे अॅड. सीमा तेलंग यांनी सांगितले. त्याचप्रमाणे आदिवासी विकास मंत्री वुईके यांनी पात्रता नसताना आपली मुलगी प्रियदर्शिनी वुईके हिला मुंबई उच्च न्यायालयात 'ब' वर्ग समुपदेशक म्हणून नियुक्ती मिळवून दिल्याचा आरोप त्यांनी केला.
आरोप बिनबुडाचे, हे काँग्रेसचे षड्यंत्र : मंत्री अशोक वुईके
अॅड. सीमा तेलंग यांच्या आरोपाबाबत आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांना विचारणा केली असता ते म्हणाले, सीमा तेलंग या काँग्रेसच्या सक्रिय सदस्या आहेत. माजी मंत्री प्रा. वसंत पुरके यांच्या सल्ल्यानुसार त्या माझ्यावर व मुलगी अॅड. प्रियदर्शनीवर बिनबुडाचे आरोप करीत आहेत. यापूर्वी पुरके यांनी पत्रकार परिषदेतून माझ्यावर आरोप केले होते. मुळात जमिनीचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. माझी मुलगी आदिवासी जमाती अनुसूचित क्षेत्रातून निवडणूक लढवत आहे. ती उच्चविद्याविभूषित आहे. त्यामुळे माझ्या मुलीचा अपमान, अनादर करण्याचा अधिकार अॅड. सीमा तेलंग यांना नाही. हा सर्व प्रकार काँग्रेस आणि पुरके यांचे षड्यंत्र आहे. योग्य वेळी याचे उत्तर दिले जाईल, अशी प्रतिक्रिया आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. वुईके यांनी दिली.