Ganesh Festival 2018 : नागपुरात गणरायाच्या निरोपासाठी कडेकोट बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 00:50 IST2018-09-22T00:48:02+5:302018-09-22T00:50:39+5:30
रविवारी होणाऱ्या गणरायाच्या निरोपासाठी शहर पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली आहे. अधिकाऱ्यांसह तब्बल दोन हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

Ganesh Festival 2018 : नागपुरात गणरायाच्या निरोपासाठी कडेकोट बंदोबस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रविवारी होणाऱ्या गणरायाच्या निरोपासाठी शहर पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली आहे. अधिकाऱ्यांसह तब्बल दोन हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
नागपुरात सुमारे १०१० सार्वजनिक गणेश मंडळांतर्फे गणेश प्रतिमांची स्थापना करण्यात आली आहे. यापैकी सर्वाधिक गणेश प्रतिमांचे विसर्जन २३ सप्टेंबर रोजी रात्रीला होण्याची शक्यता आहे. विसर्जनासाठी चोख पोलीस बंदोबस्त केला आहे. यात ७ डीसीपी, १० एसीपी, ४२ पोलीस निरीक्षक, १२९ एपीआय-पीएसआय आणि १७०० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांनी विसर्जनाच्या मार्गात सुरक्षेचे जाळे पसरविले आहे. विसर्जन मार्गाला १२ सेक्टरमध्ये विभाजित करण्यात आले आहे. महत्त्वपूर्ण सेक्टरमध्ये अतिरिक्त पोलीस अधिकारी कर्मचारयांना तैनात करण्यात आले आहे. त्यांच्या मदतीसाठी वाहतूक विभागातील पोलीस अधिकाऱ्यांसह ६०० कर्मचारीही तैनात राहतील. एसआरपीची एक कंपनीही तैनात करण्यात आली आहे. सर्वाधिक गणेश प्रतिमांचे विसर्जन फुटाळा तलावात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नेहमीप्रमाणे फुटाळा तलावावर सुरक्षेची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. केवळ गणेश प्रतिमा असलेल्या वाहनांनाच तलावापर्यंत जाता येईल. नागरिकांची वाहने तेलंगखेडी हनुमान मंदिर रोड आणि वायुसेना रोडवर पार्क केली जातील. त्याचप्रकारे अमरावती रोडने येणाऱ्या वाहनांना कॅ म्पस टी पॉर्इंटवर रोखले जाईल. फुटाळा तलवावर वाहतूक व्यवस्था संचालित करण्यासाठी मोबाईल सर्व्हिलन्स व्हेईकल (एमएसवी) चा वापर केला जाईल. वाहनातील सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनच्या मदतीने परिसरावर नजर ठेवली जाईल. वाहनातच कंट्रोल रुमसुद्धा आहे. त्याच्या स्क्रीनवर सर्व हालचाली स्पष्टपणे दिसून येतील. उच्च न्यायालयाने डीजे वाजवण्यास मंजुरी न दिल्यामुळे पोलिसांनी गणेश मंडळाना याचा वापर न करण्याचे आवाहन केले आहे.