महाज्योतीच्या २० प्रशिक्षणार्थ्यांची विक्रीकर सहाय्यकपदी निवड; चंद्रपूरचा राहुल विजय जेंगठे राज्यात प्रथम
By आनंद डेकाटे | Updated: July 20, 2023 12:59 IST2023-07-20T12:58:52+5:302023-07-20T12:59:42+5:30
वर्ष २०२०-२१ या आर्थिक वर्षात इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी परिक्षा प्रशिक्षण योजना सुरु करण्यात आलेली आहे.

महाज्योतीच्या २० प्रशिक्षणार्थ्यांची विक्रीकर सहाय्यकपदी निवड; चंद्रपूरचा राहुल विजय जेंगठे राज्यात प्रथम
नागपूर : महाज्योतीच्या एम.पी.एस.सी परीक्षा प्रशिक्षणातून २० प्रशिक्षणार्थ्यांची विक्रीकर सहाय्यक पदी निवड झालेली आहे. यात १४ इतर मागास वर्ग, ५ विमुक्त जाती - जमाती, १ विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थांचा समावेश आहे.
यशस्वी उमेदवारांमधे राहुल जेंगठे, गायत्री गलखे, पियुष डोंगरे, मारुती शेंदगे, रुपाली खाडे, जलिंदर कसार, पोपट करांदे, सत्यजीत साबळे, संतोष अंबुले, ऋतुजा मसाळ, अविनाश वाघमारे, मयुर लोणकार, परेश भावसार, स्वाती डोंगरे, मयुर देवरे, जगदिश केदार, हरीश शिंदे, वैभव नन्नावरे, रिंकल हडके, प्रशांत बोरकुटे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या संस्थेमार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना राज्यात तसेच केंद्र शासनात सेवेची संधी प्राप्त व्हावी, याकरीता एम.पी.एस.सी परीक्षा प्रशिक्षण योजना राबविण्यात येते. या योजने अंतर्गत विद्यार्थ्याच्या आर्थिक तसेच शैक्षणिक गरजा लक्षात घेता विद्यावेतनही पुरविल्या जाते.
विशेष म्हणजे चंद्रपुरचा राहुल जेंगठे हा विद्यार्थी राज्यात पहिला आला आहे. राहुलने आपल्या या यशाचे श्रेय आपल्या पालकासोबत महाज्योतीला, महाज्योतीच्या प्रशिक्षक वर्गाला तसेच प्रशिक्षणा दरम्यान दिल्या जाणाऱ्या विद्यावेतनाला दिलेले आहे. राहुल जेंगठे या विद्यार्थ्याचे विशेष कौतुक करुन विद्यार्थ्यांनी एमपीएससी परिक्षा प्रशिक्षण योजनेचा लाभ घ्यावा, असे महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी आवाहन केले आहे.
वर्ष २०२०-२१ या आर्थिक वर्षात इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी परिक्षा प्रशिक्षण योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेत सहभाग घेण्यासाठी जाहिरातीच्या माध्यमातून नॉनक्रिमिलेअर उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांकडून महाज्योतीच्या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात येतात. पात्र विद्यार्थ्यांना एम.पी.एस.सी परीक्षा प्रशिक्षण योजनेत सहभाग दिला जातो.