आज इंटरनॅशनल स्पेस स्टेशन उघड्या डोळ्यांनी बघा

By निशांत वानखेडे | Updated: January 9, 2025 18:41 IST2025-01-09T18:40:09+5:302025-01-09T18:41:03+5:30

सायंकाळी ६.३० पासून देईल दर्शन : गुरू, शुक्र, शनिचेही हाेईल दर्शन

See the International Space Station with your bare eyes today | आज इंटरनॅशनल स्पेस स्टेशन उघड्या डोळ्यांनी बघा

See the International Space Station with your bare eyes today

निशांत वानखेडे, नागपूर
नागपूर : आकाशात विविध ग्रह ताऱ्यांच्या हालचाली सध्या पृथ्वीच्या अगदी जवळून सुरू असल्याने त्यांची भ्रमंती उघड्या डाेळ्यांनी किंवा स्पष्ट स्वरूप टेलिस्काेपने बघण्याची संधी खगाेलप्रेमींना मिळत आहे. यासोबतच अवकाश संशाेधनासाठी मानव निर्मित इंटरनॅशनल स्पेस स्टेशन पाहण्याची खास संधी चालून आली आहे. शुक्रवारी सायंकाळच्या वेळी अंतराळ संशाेधन स्टेशनचे उघड्या डाेळ्यांनी दर्शन करता येणार आहे.

हे स्पेस स्टेशन ज्यावेळी पृथ्वीच्या ज्या भागातून जाते, तेव्हा ते एखाद्या फिरत्या चांदणीच्या स्वरूपात नुसत्या डोळ्यांनी पाहता येते. शूक्रवारी संध्याकाळी ६.३६ वाजतापासून ते ६.४२ वाजतापर्यंत हे स्टेशन मध्य भारताच्या वरून जात आहे. त्यामुळे ते स्टेशन अधिक प्रकाशमान स्वरूपात निरभ्र आकाशात नुसत्या डोळ्यांनी पाहता येईल. तसेच यावेळी शूक्र, शनी आणि गुरु जवळ चंद्र आणि मंगळ ग्रहाचे सहज दर्शन होईल. या अनोख्या खगोलीय घटनांचा आनंद घेण्याचे आवाहन विश्वभारती केंद्राचे संचालक प्रभाकर दोड यांनी केले आहे. अवघ्या दिड तासात पृथ्वीची एक प्रदक्षिणा पूर्ण करणारे हे महाकाय आकाराचे स्पेस स्टेशन मुंबई ते नागपूर एवढे अंतर केवळ दिड मिनिटांत पूर्ण करते. बहु परिचित भारतीय वंशाच्या सुनिता विल्यम्स यामध्ये वास्तव्यास आहेत. सुनिता विल्यम्स केवळ सात दिवसांच्या संशोधनासाठी गेल्या हाेत्या, परंतु स्टार लायनर या परतीच्या यानात हेलियम वायू गळतीमुळे गेल्या सात महिन्यांपासून त्याच पृथ्वीवर येण्याच्या प्रतिक्षेत आहेत.

यावेळीचे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन हे भारताच्या मध्य भागातून जात असल्याने त्याच्या दर्शनाचा लाभ अधिक संख्येने घेता येईल. ठिकाणातील बदलामुळे काहीसा दिशा, वेळ व तेजस्वीतेत फरक होईल. या फिरत्या चांदणीचा आरंभ पश्चिमेस खूप ठळक दिसणाऱ्या शूक्रा जवळून होईल. याच वेळी जवळच्या शनी ग्रहाचे व नंतर आज होणाऱ्या चंद्र व गुरु युतीचेही दर्शन घेता येईल. आकाश मध्य भागात हे स्पेस स्टेशन अधिक तेजस्वी जवळ जवळ शूक्रा सारखे असेल. गुरु, चंद्राचे भेटी नंतर हे स्टेशन लालसर मंगळाचे उत्तर आकाशात समारोप करताना दिसेल. संध्याकाळी नैॠत्य आकाशात सुरू होऊन उत्तर-पूर्व अर्थात ईशान्य आकाशात संपुष्टात येईल.

Web Title: See the International Space Station with your bare eyes today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.