भरदिवसा नागपूर उड्डाणपुलावरून उडी घेत सुरक्षारक्षकाने केली आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 15:26 IST2025-08-05T15:25:43+5:302025-08-05T15:26:08+5:30
Nagpur : मानकापूर उड्डाणपुलावर झालेली थरारक घटना

Security guard commits suicide by jumping from Nagpur flyover in broad daylight
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भरदिवसा मानकापूरकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावरून उडी घेत सुरक्षा रक्षकाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. उड्डाणपुलाखाली रहदारी असताना त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. यशवंत रमेश शाहू (३१, कुकरेजा नगर, जरीपटका) असे मृतक सुरक्षारक्षकाचे नाव आहे. तो मेस्को' मध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. दुपारी दीड वाजेच्या सुमारास कोराडीहून सदरच्या दिशेने निघाला होता. पागलखाना चौकाजवळ त्याने गाडी थांबविली व हेल्मेट काढून तो उड्डाणपुलाच्या कठड्याजवळ जाऊन उभा झाला. बराच वेळ तो तेथे उभा होता व अचानक त्याने रेलिंगवर चढून खाली उडी मारली. ते पाहून वाहनचालकांनी वाहने थांबविली व खाली पाहिले. यशवंत रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. खालील रस्त्यावरून जाणाऱ्यांसाठी देखील हा मोठा धक्का होता. तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. मानकापूर पोलिसांनी त्याला मेयो इस्पितळात नेण्यात आले. मात्र, त्याला मृत घोषित करण्यात आले.
व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, त्याने उडी मारताच काही वाहनचालकांनी उड्डाणपुलावरून व्हिडीओ बनविला. तर खाली रस्त्यावरदेखील लोक व्हिडीओ बनवत होते. त्याने गणवेश घातला होता व रक्तबंबाळ अवस्थेत तो पडला होता. पोलिस आल्यानंतरच त्याला रुग्णवाहिकेतून इस्पितळात नेण्यात आले.