Coronavirus in Nagpur; कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वाढला ३० टक्क्याने मानसिक आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 07:10 IST2021-05-23T07:10:00+5:302021-05-23T07:10:02+5:30

Nagpur News कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत ३ लाख ४५ हजार १६४ नवे रुग्ण आढळून आले आहेत तर, ४,७८८ रुग्णांचे बळी गेले आहेत. याचा मोठा प्रभाव मानसिक आरोग्यावरही पडला आहे. आजाराची भीती आणि चिंतेमुळे मानसिक आजाराच्या रुग्णात साधारण ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

The second wave of corona increased mental illness by 30 percent | Coronavirus in Nagpur; कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वाढला ३० टक्क्याने मानसिक आजार

Coronavirus in Nagpur; कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वाढला ३० टक्क्याने मानसिक आजार

ठळक मुद्देमेयोत महिन्याकाठी ७०० रुग्ण लहान मूल, तरुण व्यक्ती गमावलेल्या नातेवाईकांमध्ये गंभीर लक्षणे

सुमेध वाघमारे

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत ३ लाख ४५ हजार १६४ नवे रुग्ण आढळून आले आहेत तर, ४,७८८ रुग्णांचे बळी गेले आहेत. याचा मोठा प्रभाव मानसिक आरोग्यावरही पडला आहे. आजाराची भीती आणि चिंतेमुळे मानसिक आजाराच्या रुग्णात साधारण ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेषत: या आजारात ज्यांनी लहान मूल, तरुण व कर्ता व्यक्ती गमावला आहे, त्या कुटुंबातील नातेवाईकांमध्ये मानसिक आजाराची गंभीर लक्षणे दिसून येत असल्याचे पुढे आले आहे.

कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या आजाराचा परिणाम केवळ शरीरावरच नाही तर मनावरही झाला आहे. काही रुग्णांमध्ये व सामान्यांमध्ये इतकी जबरदस्त भीती व चिंता वाढली आहे की, त्यांच्यावरील मानसिक परिणाम दुरोगामी होण्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) मानसिक रोग विभागाचे प्रमुख डॉ. अभिषेक सोमानी यांच्यानुसार, कोरोनाचा शारीरिक आरोग्यावर होणाऱ्या परिणामापेक्षा मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम दीर्घकाळ टिकतो. यामुळे मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे ठरते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येत जवळपास तिपटीने वाढ झाल्याने मेयोच्या मानसिक रोग विभागात महिन्याला जवळपास ७०० ते ८०० रुग्ण उपचारासाठी येत आहेत. ही संख्या मोठी आहे.

- आजार होऊ नये याची अतिकाळजी तर, काहींना पुन्हा आजार होण्याची भीती

डॉ. सोमानी म्हणाले, मानसिक रोगाच्या रुग्णांमध्ये तीन प्रकारचे रुग्ण दिसून येत आहेत. पहिल्या प्रकारात कोरोना होऊ नये याची खूप जास्त काळजी घेणारे रुग्ण आहेत. यातील काही रुग्ण पुन्हा पुन्हा हात धुतात. काही रुग्ण कोरोना होईल या भीतीने घराबाहेर जाण्यास टाळतात, घरातही कुणाला येऊ देत नाही. दुसऱ्या प्रकारात कोरोनातून बरे झालेले परंतु पुन्हा आजार होण्याची भीती बाळगून असलेले रुग्ण आहेत. अशा रुग्णांमध्ये थोडे जरी डोके दुखले किंवा शिंक आली तर कोरोना तर नाही ना अशी हुरहुर लागते. सध्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसची मोठी धास्ती पाहायला मिळत आहे. असे रुग्ण समुपदेशाने बरे होतात.

- तिसऱ्या प्रकारातील रुग्णांना औषधोपचाराची गरज

ज्या कुटुंबात कोरोनामुळे लहान मूल, तरुण किंवा कर्ता व्यक्ती मृत पावला आहे, त्यांच्या नातेवाईकांच्या मनावर मोठा आघात झाल्याचे दिसून येत आहे. कोरोना प्रभावित मानसिक आजाराच्या या तिसऱ्या प्रकारातील रुग्णाची संख्या अलीकडे वाढली आहे. यांच्यात नैराश्याचे प्रमाण मोठे असल्याने त्यांना औषधोपचाराखाली आणणे गरजेचे आहे. आयसीयूमध्ये उपचार घेऊन बरे झालेल्या वयोवृद्धांमध्ये भ्रमित होण्याचे प्रमाण वाढल्याचेही डॉ. सोमानी म्हणाले.

- अनिश्चिततेचा विचार आला की सजग व्हा

कोरोनाचा हा प्रादुर्भाव पुढचे काही दिवस वा महिने टिकू शकतो, म्हणूनच मनाला बदल मिळू देणे महत्त्वाचे आहे. जमेल तेव्हा निसर्गाच्या सान्निध्यात जा, सूर्यप्रकाशात जाणे अधिक चांगले. व्यायाम करा, चांगला आहार घ्या आणि भरपूर पाणी प्या. मनामध्ये अनिश्चिततेचा विचार आला की त्याबद्दल सजग व्हा. विचार करून काहीही फायदा होणार नाही, असे स्वत:ला समजवा.

-डॉ. अभिषेक सोमानी, मानसिक रोग विभाग, मेयो

Web Title: The second wave of corona increased mental illness by 30 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.