स्कॉटलँडच्या युवकाने लावला चुना
By Admin | Updated: November 12, 2016 02:51 IST2016-11-12T02:51:33+5:302016-11-12T02:51:33+5:30
लठ्ठ पगाराची नोकरी लावून देण्याच्या नावावर एका अभियांत्रिकी विद्यार्थिनीची स्कॉटलँडच्या व्यक्तीने फसवणूक केल्याचा प्रकार

स्कॉटलँडच्या युवकाने लावला चुना
अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीला फसविले : फेसबुकद्वारे फ्रेण्डशीप नागपूर : लठ्ठ पगाराची नोकरी लावून देण्याच्या नावावर एका अभियांत्रिकी विद्यार्थिनीची स्कॉटलँडच्या व्यक्तीने फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. लॉटीर पीटर रा. स्कॉटलँड असे आरोपीचे नाव आहे.
पीडित सीमा इंगळे या अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थिनीला पीटरने फेसबुकवर ‘फ्रेण्डशीप’ पाठवली. सीमाने कुठलाही प्रतिसाद दिला नाही. यानंतर पीटर तिला व्हॉट्सअॅपवर मॅसेज पाठवू लागला. त्याने एप्रिल महिन्यात पाठविलेल्या मॅसेजद्वारे अमेरिका किंवा ओएनजीसीमध्ये लठ्ठ पगाराची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखविले. नोकरीच्या लालसेने सीमा त्याच्या जाळ्यात अडकली. पीटरने सीमाला तिच्या नावाने भेटवस्तू असलेले एक पार्सल आणि ४० हजार पौंड पाठवल्याचे सांगितले. तसेच हे सामान घेण्यासाठी कस्टम शुल्क म्हणून १५ हजार रुपये जमा करण्यास सांगितले. ही रक्कम जमा केल्यानंतर पार्सल विमानतळावरच असल्याचे सांगून पुन्हा ४० हजार रुपये जमा करण्यास सांगितले. पैसे जमा न केल्यास मनी लाँड्रिगच्या प्रकरणात फसवण्याची भीती दाखवली. नियमांची माहिती नसल्याने सीमा घाबरली. तिने ४० हजार रुपये जमा केले.
यानंतरही पार्सल किंवा नोकरीचा कुठलाही पत्ता मिळाला नसल्याने चिंतेत पडलेल्या सीमाने पीटरशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यानंतर त्याने कुठालही प्रतिसाद दिला नाही. काही वेळानंतर त्याचा मोबाईल नंबरसुद्धा बंद झाला. तेव्हा आपण फसवले गेल्याचे सीमाच्या लक्षात आले. गेल्या सहा महिन्यांपासून सीमा या प्रकरणी तक्रार करायची की नाही, याचा विचार करीत होती.
शेवटी प्रतापनगर पोलीस ठाण्यात जाऊन तिने तक्रार दाखल केली. पोलिसांनी फसवणुकीचा आणि माहिती तंत्रज्ञानांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सीमा ही बाहेरगावची विद्यार्थिनी आहे.(प्रतिनिधी)
दिल्लीच्या टोळीवर संशय
या प्रकरणात दिल्ली येथील सायबर टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दिल्ली येथे नायजेरियन युवक या प्रकारची फसवणूक करीत असतात. या टोळीतील सदस्य यापूर्वी सुद्धा अनेकदा सापडले आहे. तुरुंगातून सुटताच ते पुन्हा सक्रिय होतात.