नागपूर जिल्ह्यातील शाळाही १३ डिसेंबरपर्यंत बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 00:39 IST2020-11-26T00:38:09+5:302020-11-26T00:39:24+5:30
Schools closed till December 13, nagpur news कोरोनाचा पार्श्वभूमीवर गेल्या आठ महिन्याहून अधिक कालावधीपासून बंद असलेल्या शाळा, उद्या गुरुवार २६ नोव्हेंबरपासून सुरू करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या होत्या. परंतु आता नागपूर शहराप्रमाणेच ग्रामीण भागातील शाळाही न उघडण्याचा निर्णय तूर्तास १३ डिसेंंबरपर्यंत रोखण्यात आला आहे.

नागपूर जिल्ह्यातील शाळाही १३ डिसेंबरपर्यंत बंदच
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा पार्श्वभूमीवर गेल्या आठ महिन्याहून अधिक कालावधीपासून बंद असलेल्या शाळा, उद्या गुरुवार २६ नोव्हेंबरपासून सुरू करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या होत्या. परंतु आता नागपूर शहराप्रमाणेच ग्रामीण भागातील शाळाही न उघडण्याचा निर्णय तूर्तास १३ डिसेंंबरपर्यंत रोखण्यात आला आहे. यानंतर पुढील परिस्थितीनुसार शाळा उघडण्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बुधवारी दिली. शाळा सुरु होत नसल्या तरी शासनाने सर्व शाळांमध्ये नियमांनुसार शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य राहणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यापूर्वी राज्य शासनाने २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचे निर्देश दिले होते. परंतु त्यात शासनाने स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन शाळा सुरु करण्याची जबाबदारी स्थानिक वरिष्ठ प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर सोपविली होती. पहिल्या टप्प्यात इयत्ता ९ ते १२ वीचेच वर्ग सुरू होणार होते. परंतु नागपूर ग्रामीण मधील ६५७ शाळांमध्ये कोविड-१९ संदर्भातील सर्व नियमांची खबरदारी घेऊन तसेच पालकांच्या संमतीनंतरच वर्ग येत्या २६ नोव्हेंबरपासून सुरु होणार होते. परंतु बहुतांश पालक यासाठी तयार नव्हते. तसेच शिक्षकांच्या संघटनांचाही विरोध होता. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने शहराप्रमाणेच ग्रामीण भागातीलही शाळा १३ डिसेंबर २०२० पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा सुरु करण्यासंदर्भात सर्व संबंधितांची बैठक घेऊनच शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले
१०६ शिक्षकांना कोरोनाची बाधा
नागपूर ग्रामीण भागामध्ये इयत्ता ९ ते १२ वीपर्यंतच्या एकूण ६५७ शाळा असून, येथे ५९४४ शिक्षक कार्यरत आहेत. तर ३२०३ शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. शासनाच्या निर्देशानुसार शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करणे गरजेचे होते. त्यानुसार आजवर ४८६२ शिक्षकांच्या कोरोनाच्या आरटीपीसीआर तपासण्या झाल्या असून, त्यापैकी १०६ शिक्षकांना कोरोनाची बाधा झाल्याचे चाचणी अहवालातून स्पष्ट झाले आहे.
७४ टक्के पालकांचा हाेता विरोध
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्व व्यवस्थापनाच्या ६५७ शाळांमध्ये जवळपास १ लाख ३० हजार ४५४ विद्यार्थी प्रवेशित असून, यापैकी २६ टक्के पालकांनी पाल्याला शाळेत पाठविण्याचे संमतीपत्र दिले आहे. म्हणजेच केवळ ३४ हजार २१३ पालकांनीच शाळेमध्ये आपल्या पाल्यास पाठविण्याला व शाळा सुरू करण्याबाबत संमतीपत्राव्दारे होकार दर्शविला आहे. तर तबब्ल ७४ टक्के पाालकांचा नकार होता. इतकेच नव्हे ५६ शाळांमधील पालकांनी तर चक्क शाळा सुरूच करु नये म्हणून संमतीपत्र दिले आहेत.