The schedule of rain stars became irregular! | पावसाच्या नक्षत्रांचे वेळापत्रक झाले अनियमित!

पावसाच्या नक्षत्रांचे वेळापत्रक झाले अनियमित!

ठळक मुद्दे२५ वर्षात बदलनिसर्गचक्राच्या असंतुलनाचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारतीय खगोलशास्त्र तर्कशुद्ध आणि शास्त्रशुद्ध आहे. या अभ्यासानुसार मागील कित्येक वर्षांपासून पावसाची नक्षत्रे नियमित पडायची. परंतु मागील २५ वर्षात बराच बदल जाणवत आहे. पावसाची नक्षत्रे अनियमित झाली आहेत. जंगलतोड, प्रदूषण, तापमान वाढ आणि हवामान बदल या कारणांमुळे ही निसर्गाची व्यवस्था नष्ट झाल्याची नोंद आहे.
एकूण २७ नक्षत्रांपैकी मृग, आर्द्रा, पुनर्वसू, उत्तरा, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त ही पावसाची नक्षत्रे मानली जातात. यापैकी पहिले नक्षत्र म्हणजे मृग. सूर्याचा ८ जून रोजीचा मृग नक्षत्र प्रवेश म्हणजे, अर्थातच पावसाला प्रारंभ असतो. अगदी वचन पाळल्याप्रमाणे या नक्षत्राचा पाऊस दाखल होतो. पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना हे नक्षत्र मोठा दिलासा देऊन जाते.
प्रत्येक नक्षत्रामध्ये पावसाचे एक वेगळे रूप अनुभवास मिळते. मृग नक्षत्रापासून पुष्य नक्षत्रापर्यंत पडणारा पाऊस बहारदार असतो. निसर्गाला या काळात बहर येतो. सृष्टी हिरवीगार होऊन शेती डोलू लागते. आषाढ-श्रावणातील रिमझिम झेलण्यासाठी आतुर झालेली मने यावेळी ऊन-पावसाचा खेळही अनुभवताना दिसतात. पुष्य नक्षत्रातील पावसाच्या धारा घननिळा वर्षावातून इंद्रधनूचे अप्रतिम दर्शन घडवतात. मृग नक्षत्रापासून उत्तरा नक्षत्रापर्यंत जोरदार बरसणारा पाऊस नक्षत्रांप्रमाणे कमी-अधिक प्रमाणात उपस्थिती लावतो.
मृग हे वचन पाळणारे नक्षत्र आहे. या नक्षत्रात हमखास ठरल्या तारखेला पाऊस येतोच. स्वाती नक्षत्रात थोडा तरी पाऊस पडावा म्हणतात. चातकाला या पावसाची ओढ असते. तर, सागरामध्ये शिंपल्यात स्वाती नक्षत्राचा थेंब पडला तर त्याचा मोती होतो, असे म्हणतात. या नक्षत्रातील पावसाचा शिडकावा लाभदायक मानला जातो. मात्र, विशाखा नक्षत्रातील पाऊस काहीसा हानिकारक मानला जातो.

असे होते वेळापत्रक
नक्षत्र       वाहन           पावसाचे स्वरूप         कालावधी
मृग           मेंढा          हुलकावणी देणारा       ८ जून ते २१ जून
आर्द्रा          हत्ती          सरासरी पाऊस            २२ जून ते ५ जुलै
पुनर्वसू      बेडूक           हुलकावणी देणारा       ६ जुलै ते १९ जुलै
पुष्य           गाढव       कुठे जास्त कुठे कमी      २० जुलै ते २ आॅगस्ट
आश्लेषा       घोडा         सामान्य पाऊस              ३ आॅगस्ट ते १६ आॅगस्ट
मघा         उंदीर            पावसाची उघडझाप        १७ आॅगस्ट ते ३० आॅगस्ट
पूर्वा          हत्ती            सरासरी पाऊस            ३१ आॅगस्ट ते १२ सप्टेंबर
उत्तरा         मेंढा            हुलकावणी देणारा         १३ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर
हस्त           म्हैस           सरासरी पाऊस           २७ सप्टेंबर ते ९ आॅक्टोबर
चित्रा          कोल्हा          संमिश्र पाऊस             १० आॅक्टोबर ते २३ आॅक्टोबर
स्वाती         मोर             सामान्य पाऊस           २४ आॅक्टोबर ते ७ नोव्हेंबर

Web Title: The schedule of rain stars became irregular!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.