Satara: पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा, कळंबी येथील घटना; काैटुंबिक वादातून कृत्य
By दत्ता यादव | Updated: March 18, 2024 23:04 IST2024-03-18T23:03:57+5:302024-03-18T23:04:43+5:30
Satara News: झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिचा खून करणारा पती गणेश लक्ष्मण खाडे (वय ३०, रा. पळशी, ता. माण) याला वडूज येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. हुद्दार यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही घटना कळंबी (ता. खटाव) येथे १४ एप्रिल २०१६ रोजी घडली होती.

Satara: पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा, कळंबी येथील घटना; काैटुंबिक वादातून कृत्य
- दत्ता यादव
सातारा - झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात दगड घालून तिचा खून करणारा पती गणेश लक्ष्मण खाडे (वय ३०, रा. पळशी, ता. माण) याला वडूज येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. व्ही. हुद्दार यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ही घटना कळंबी (ता. खटाव) येथे १४ एप्रिल २०१६ रोजी घडली होती.
या खटल्याची पार्श्वभूमी अशी, गणेश खाडे आणि पत्नी प्रियंका खाडे (वय २३) या दोघांमध्ये काैटुंबिक कारणातून कळंबी येथे १३ मार्च २०१६ रोजी वाद झाला होता. त्यावेळी गणेश याने पत्नी प्रियंकाला शिवीगाळ व दमदाटी केली होती. दरम्यान, या बाचाबाचीचा राग मनात धरून गणेश याने १४ एप्रिल २०१६ रोजी रात्री झोपेत असलेल्या प्रियंकाच्या डोक्यात दगड घालून तिला गंभीर जखमी केले. तिला तातडीने कऱ्हाड येथील कृष्णा हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेची औंध पोलिस ठाण्यात नोंद झाली होती. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक डी. आर. अतिग्रे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सुनावणीदरम्यान एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षीदार ग्राह्य मानून न्यायालयाने गणेश खाडे याला जन्मठेप व २० हजार रुपये दंड व दंड न दिल्यास सहा महिने साधी कैद, अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी अभियोक्ता व्ही. एच. काटकर यांनी काम पाहिले. पोलिस प्राॅसिक्यूशन स्काॅडचे सहायक फौजदार दत्तात्रय जाधव, पोलिस काॅन्स्टेबल जे. जे. शिंदे, महिला पोलिस हवालदार विजयालक्ष्मी दडस, सागर सजगणे, ए. आर. शिकलगार यांनी सहकार्य केले.